देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला विरोध:भीमाशंकर, अष्टविनायक मंदिरांसह शेकडो देवस्थानांचे रणशिंग
![]()
भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान आणि अष्टविनायक समितीसह पुणे पंचक्रोशीतील शेकडो प्रमुख देवस्थानांनी ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन (प्रारूप) अधिनियम, २०२६’ या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. देवस्थानांच्या जमिनी वाचल्या तरच मंदिरे आणि धर्मकार्य सुरक्षित राहील, असे सांगत सरकारने जमिनी अधिग्रहित करण्याचे काम तात्काळ थांबवावे, असा इशारा या देवस्थानांनी दिला आहे. मंदिर महासंघाच्या वतीने पुण्यात या कायद्याविरोधात महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. या जाचक कायद्याला विरोध करण्यासाठी आणि सरकारला वेळेत पावले उचलण्याची चेतावणी देण्यासाठी पुढील २५ दिवसांत लाखो कायदेशीर हरकती नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, राज्यभर व्यापक स्वाक्षरी अभियान, प्रत्येक मंदिरात महाआरती, आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर ‘घंटानाद आंदोलन’ आणि गरज पडल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर ‘महाआंदोलन’ छेडण्याचा निर्धार मंदिर विश्वस्तांनी केला आहे. लवकरच ‘राज्यस्तरीय देवस्थान भूमी संरक्षक परिषद’ आयोजित करण्याचीही घोषणा करण्यात आली. पुण्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर (सारसबाग), खंडोबा मंदिर (आकुर्डी) आणि श्री सियाराम मंदिर, गोशाळा (हडपसर) येथे झालेल्या बैठकांमध्ये विविध मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. ज्येष्ठ अधिवक्ता एस. के. जैन यांनी देवस्थानांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या जमिनी सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी या कायद्यामागील शासनाचा हेतू संशयास्पद वाटत असल्याचे सांगत विश्वस्तांना जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहन केले. रांजणगाव महागणपती देवस्थानचे विश्वस्त डॉ. तुषार पाटील पाचुंदकर यांनी अष्टविनायक मंदिरांचा या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला. भीमाशंकर देवस्थानचे अधिवक्ता सुरेश कौदरे यांनी सेवाधार्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी हा लढा मंदिरांच्या अस्मितेचा असल्याचे नमूद करत, २ जून रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन राज्यभर आंदोलनाचा श्रीगणेशा केला जाईल, अशी चेतावणी सरकारला दिली. या आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक मंदिरात जनजागृतीचे फलक लावून व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख विश्वस्त एकवटले आहेत.
