विषारी दारू प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?:रोहित पवारांचा सवाल; पोलिसांना मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे आवाहन

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-13t12_1780124161.png




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील विषारी दारूकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या मुखियाला जमणार नसल्याचे लक्षात आल्यानेच सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामागे कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य पोलिसांना उपरोक्त आवाहन करत या प्रकरणाच्या सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. CID कडे तपास दिल्यास काय परिस्थिती होते हे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासावरून दिसतंच आहे. पण किमान चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग अशा प्रकारच्या छोट्या गुन्ह्यांचा तपास CID करेल असं वाटल्यानेच कदाचित त्यांच्याकडे हा तपास दिला असावा किंवा अजितदादांच्या अपघाताप्रमाणे या दारूकांडातही कुणालातरी वाचवण्याचा यामागे काही हेतू नाही ना, हेही तपासण्याची गरज आहे. पण आमचंही हेच मत आहे की, राज्य सरकारने यापुढे पोलीस ठाणे वसुलीसाठी राखीव ठेवून चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासाचं काम CID कडेच सोपवावं आणि अजितदादांच्या अपघाताचा तपास विधानसभेत दिलेल्या शब्दाप्रमाणे CID कडून काढून CBI कडे द्यावा. यामुळं किमान अजितदादांना तरी न्याय मिळेल. खरं म्हणजे काही पोलिसांमुळे बहुतांश प्रामाणिक पोलिसांची बदनामी होते, हे कुणी लक्षात घेत नाही. त्यामुळं मराठी माणूस म्हणून मला पोलिसांनाही विचारायचं की, किती दिवस तुम्ही हे असं दबावाखाली काम करणार? कधीतरी मराठी बाणा दाखवून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांची मान अभिमानाने उंचावेल असं काम करणार की नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. कमी पाऊसमानामुळे त्वरित कामाला लागा रोहित पवार यांनी यावेळी यंदाच्या कमी पाऊसमानामुळे सरकारला वेळ न दवडता त्वरीत कामाला लागण्याचाही सल्ला दिला आहे. यंदा ‘एल निनो’चा पावसावर तीव्र परिणाम होणार असून आता 90 टक्केच पाऊस पडणार असल्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. यापूर्वी सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. आपल्या कृषीप्रधान राज्यासाठी तर ही धडकी भरवणारी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. याचा राज्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला जबर फटका बसू शकतो. त्यामुळं दुष्काळाची झळ कमी करायची असेल तर याबाबत आवश्यक उपाययोजना खूप वेगाने कराव्या लागणार असून सरकारला याबाबत निवेदनही दिलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. पण आताचा सुधारित अंदाज बघता थोडाही वेळ न दवडता सरकारने त्वरित कामाला सुरुवात करावी, ही विनंती, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारला आत्मचिंतन करण्याचा सल्ला रोहित पवारांनी यावेळी अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या खरेदीवरून केंद्राला आत्मचिंतन करण्याचाही टोला हाणला. आज चीन – इराणकडून हवं तेवढं आणि स्वस्त दरात तेल खरेदी करत असताना भारतात मात्र तेलाची मारामार सुरूय. लोकांना शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरलाही डिझेल मिळत नाही. आपल्याला अमेरिका किंवा रशिया यासारख्या भौगोलिकदृष्ट्या दूरच्या देशांकडून आणि तेही महागड्या दरात तेल खरेदी करावं लागतंय. आजपर्यंतच्या सर्वच सरकारांनी दाखवलेला कणखरपणा बाजूला ठेवून अमेरिकेसारख्या देशापुढं झुकलं तर त्याचा सामान्य माणसाला किती जबर फटका सहन करावा लागतो, हे यानिमित्ताने दिसत आहे. विशेष म्हणजे आपलं नाक दाबून अमेरिका नफेखोरी करतंय हे किती दुर्दैव आहे. इराणसोबत आपले पूर्वीपासून दृढ मैत्रीचे संबंध असतानाही आपण केवळ अमेरिकेपुढं झुकून या संबंधात बिब्बा घातला आणि याचा फटका मात्र देशातील सामान्य माणसाला सहन करावा लागतोय. आतातरी यातून धडा घेऊन सत्ताधाऱ्यांनी कोणत्या देशाची बाजू घ्यायची याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed