उद्या डीआयजी शहाजी उमाप नागरिकांच्या समस्या जाणून घेणार मोठ्या संख्येत आपल्या अडचणी मांडा
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे अन्वेषण, प्रलंबित प्रकरणे, प्रतिबंधात्मक कारवाया तसेच पोलीस प्रशासनाच्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध स्तरांवर विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाया करण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर डीआयजी शहाजी उमाप यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
दौऱ्यादरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक उमाप हे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार असून, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, तपासाची गती, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकाभिमुख उपक्रम याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
विशेष म्हणजे, या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या अडचणी आणि समस्या थेट जाणून घेण्यासाठी डीआयजी शहाजी उमाप हे दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना आपले प्रश्न, तक्रारी, अडचणी तसेच पोलीस प्रशासनासंबंधित सूचना मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे, पोलीस तपास, स्थानिक समस्या किंवा इतर कोणत्याही विषयासंदर्भात तक्रारी अथवा सूचना मांडायच्या असतील त्यांनी दिलेल्या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहावे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
डीआयजी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भेटींमुळे जनतेला आपले कोणीच ऐकले नाही हे सार्वजनिक पणे जाहीर करता येणार आहे.जनतेने या संधीचा फायदा घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि न्याय मागावा.
