Petrol Pump Facilities | पेट्रोल पंपावर ‘या’ ७ सुविधा मिळणार अगदी मोफत! वाचा सविस्तर
Petrol Pump Facilities | देशातील बहुतांश नागरिक पेट्रोल पंपावर केवळ इंधन भरण्यासाठी जातात, मात्र तिथे ग्राहकांसाठी अनेक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध असतात. केंद्र सरकारच्या ‘मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स’नुसार (Marketing Discipline Guidelines) प्रत्येक पेट्रोल पंपावर काही मूलभूत सेवा नागरिकांना विनाशुल्क देणे बंधनकारक करण्यात आले आहे. माहितीच्या अभावामुळे अनेकजण या सुविधांचा लाभ घेत नाहीत किंवा काही ठिकाणी त्यासाठी पैसेही भरतात.
प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी मशीन आणि कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे संबंधित पंपावरून पेट्रोल किंवा डिझेल घेतले नसले तरीही ग्राहकांना ही सेवा वापरण्याचा अधिकार आहे. तसेच पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. उन्हाळा किंवा लांब प्रवासादरम्यान नागरिकांना सुरक्षित पाणी मिळावे यासाठी वॉटर कुलर किंवा आरओ (RO) यंत्रणा ठेवणे आवश्यक मानले जाते.
याशिवाय पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाचा वापर कोणतीही व्यक्ती विनामूल्य करू शकते. हे शौचालय स्वच्छ आणि वापरण्यायोग्य स्थितीत ठेवण्याची जबाबदारी पंप चालकावर असते. जर स्वच्छतागृह बंद ठेवले असेल किंवा त्याची योग्य स्वच्छता केली जात नसेल, तर ग्राहक तक्रार दाखल करू शकतात. प्रत्येक पंपावर प्रथमोपचार पेटी म्हणजेच फर्स्ट एड बॉक्स (First Aid Box) उपलब्ध असणेही अनिवार्य आहे. अपघात किंवा अचानक प्रकृती बिघडल्यास प्राथमिक उपचारासाठी आवश्यक औषधे, बँडेज, मलम आणि अँटीसेप्टिक साहित्य ग्राहकांना मोफत वापरता येते.
Petrol Pump Facilities | तक्रार करण्याचा ग्राहकांना अधिकार :
आपत्कालीन परिस्थितीत ग्राहकांना पेट्रोल पंपावरून एक फोन कॉल करण्याचीही सुविधा दिली जाते. वाहन बंद पडणे किंवा अडचणीत सापडल्यास पंपावरील फोनचा वापर विनाशुल्क करता येतो. यासोबतच पोलीस स्टेशन आणि अग्निशमन दलाचे संपर्क क्रमांक पंपावर स्पष्टपणे दर्शविणे आवश्यक असते. इंधनाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास ग्राहकांना फिल्टर पेपरद्वारे पेट्रोल किंवा डिझेलची तपासणी मोफत करता येते. तसेच इंधनाचे प्रमाण अचूक आहे का हे पाहण्यासाठी पंपावर ५ लिटरचे प्रमाणित मोजमाप भांडे ठेवणे बंधनकारक आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोल पंपावर अग्निशमन यंत्रे आणि वाळूच्या बादल्या सुस्थितीत असणे आवश्यक आहे. ग्राहकांना सेवांबाबत नाराजी असल्यास ‘तक्रार पुस्तिका’ (Complaint Book) मागण्याचाही पूर्ण अधिकार आहे. पंप चालकाने ती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. जर एखादा पेट्रोल पंप कर्मचारी मोफत सुविधांसाठी पैसे मागत असेल किंवा सेवा देण्यास नकार देत असेल, तर ग्राहक संबंधित तेल कंपनीकडे किंवा त्यांच्या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने आपल्या हक्कांची माहिती ठेवणे महत्त्वाचे मानले जात आहे.
