मराठी रंगभूमीला कलात्मकतेची नवी दिशा हवी:श्रीराम लागू नाट्य महोत्सवातील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडले विचार

0
db5d5469-1181-4ec1-ba3f-1439e619ca21_1779977479861.jpg




मराठी रंगभूमी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, मानवी जीवनाचे सखोल आकलन करून घेणारी आणि नव्या काळातील आव्हाने पेलणारी कलात्मक दिशा घ्यावी, असा सूर एका परिसंवादात उमटला. श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवांतर्गत ‘मराठी रंगभूमी – काल, आज, उद्या’ या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे गुरुवारचे सत्र या परिसंवादासाठी होते. एकूण चार सत्रांमध्ये झालेल्या या चर्चेत स्पर्धा रंगभूमी, अव्यावसायिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी आणि उद्याची रंगभूमी असे विषय केंद्रस्थानी होते. इरफान मुजावर, डाॅ. अनिल बांदिवडेकर, हेमंत एदलाबादकर, हिमांशु स्मार्त, पराग घोंगे, दिलीप जगताप, शेखर ढवळीकर, क्षितिज पटवर्धन, चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम बेर्डे, इरावती कर्णिक आणि चंद्रशेखर फणसळकर या मान्यवरांनी यात भाग घेतला. पहिल्या सत्रात स्पर्धा रंगभूमीच्या संदर्भात पारितोषिकापेक्षा आनंद महत्त्वाचा असून युवा रंगकर्मींना प्रशिक्षित करणार्या स्पर्धात्मक रंगभूमीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. अव्यावसायिक रंगभूमीवरील चर्चेत प्रस्थापित साचे मोडून नव्या आणि वेगळ्या पद्धतीने प्रयोग करण्याची गरज व्यक्त झाली, मात्र ही प्रक्रिया संथ असल्याचे मत मांडण्यात आले. व्यावसायिक रंगभूमीची मुख्य धारा प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता बाजारपेठाही काबीज करण्याची अपेक्षा व्यावसायिक रंगभूमीकडून असल्याने तिची जबाबदारी वाढत असल्याचे भान आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आला. शेवटच्या सत्रात मराठी रंगभूमीच्या भावी काळाविषयी सखोल चर्चा झाली. दमदार नाटककारांचा अभाव, तत्त्वज्ञानात्मक सांस्कृतिक कृतींची कमतरता, एकाच चौकटीत फिरत राहिल्याची भावना, मनोरंजनाला प्राधान्य, जगणे समजून घेण्याची प्रक्रिया बाजूला पडणे, समीक्षकांचा अभाव, सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा अभाव आणि कलाविषयक दर्जेदार नियतकालिकांचा र्हास अशा अनेक मुद्द्यांना या सत्रात स्पर्श करण्यात आला. कोणत्याही घटनेचे केवळ प्रतिक्रियात्मक सादरीकरण आणि कलेचे मूल्यमापन करण्याऐवजी कलाकारांच्या माहितीत रस अशा घटकांवरही मान्यवरांनी विचार मांडले. या सर्व आव्हानांनंतरही, उद्याची रंगभूमी वेगाने होणारे बदल आत्मसात करत नव्या ऊर्जा, प्रतिभा आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपली मूळची प्रयोगशीलता जपेल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला. प्रसिद्ध रंगकर्मी अभिराम भडकमकर यांनी या संपूर्ण परिसंवादाचे संचलन केले. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख, नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed