लाभार्थ्यांचे सशक्तीकरण हे या बजेटचे मुख्य उद्दिष्ट- सीईओ मीनल करनवाल
नांदेड- जिल्हा परिषदेच्या स्वःउत्पन्नाच्या सन 2024-25 च्या सुधारित व सन 2025-26 च्या मूळ अर्थसंकल्पाला आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मंजुरी दिली. या अर्थसंकल्पानुसार जिल्हा परिषदेच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण अपेक्षित जमा 22 कोटी 26 लाख रुपये असून एकूण अपेक्षित खर्च 22 कोटी 21 लाख रुपये आहे. त्यामुळे अर्थसंकल्प 5 लाख 16 हजार रुपयांच्या शिल्लकीसह मंजूर करण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, अनुसूचित जाती-जमाती, महिला सशक्तीकरण, शेती आणि पशुसंवर्धन तसेच ग्रामीण विकास या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांची तरतूद असून, सीमावर्ती भागातील शाळांमध्ये सोलार बसविण्यासाठी 50 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये बाला उपक्रम राबवण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली असून, श्वानदंश व साप चावल्याने होणारे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख रुपये तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अत्याधुनिक प्रसूती कक्षासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती-जमाती आणि दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी 1 कोटी 56 लाख रुपयांची तरतूद असून, मागासवर्गीयांना विविध व्यवसायांसाठी 55 लाख तर महिलांना व्यवसायासाठी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 10 लाख रुपये आणि रोजगार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी 10 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीही 10 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
शेतीच्या आधुनिकीकरणावर भर देत शेतकरी गटांना ड्रोन खरेदीसाठी 20 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच जैविक कीटकनाशक प्रयोगशाळेसाठी 16 लाख, सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी 21 लाख आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी 18 लाख रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे. पशुधन विभागासाठी 89 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विविध औषधोपचार, इमारत दुरुस्ती आणि लसीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. लघु पाटबंधारे विभागासाठी 43 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, अतिवृष्टीमुळे बंधारा फुटल्यास शेतकऱ्यांना अनुदान देण्याचीही तरतूद या बजेटमध्ये आहे.
महिला व बालविकास क्षेत्रासाठी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना मार्केटिंग प्रशिक्षणासाठी 8 लाख रुपये, स्वयंसहाय्यता गटांतर्गत शिलाई मशीन व पीठ गिरणी यासाठी 15 लाख रुपये तसेच अंगणवाडी केंद्रात बाला संकल्पना राबवण्यासाठी 16 लाख रुपयांचा समावेश आहे.
अर्थसंकल्प मंजुरीच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी हे बजेट लाभार्थ्यांचे सशक्तीकरण हे मुख्य उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हा परिषद प्रशासनाने शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य व गावस्तरावर कचरामुक्त गाव या विषयांवर विशेष भर दिला आहे. तसेच आधीच गावस्तरावर वाटप करण्यात आलेल्या जनावरांसाठी शेड उभारणीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उत्तरे दिली. शिक्षण, आरोग्य व महिला सबलीकरणासह बजेटमधील सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असून लाभार्थ्यांना वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने नियोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
या अर्थसंकल्पीय बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन शिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे, कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. रावसाहेब, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
बजेटची वैशिष्ट्ये: या बजेटमध्ये शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य व कचरामुक्त गाव यांसाठी विशेष भर देण्यात आला आहे. तसेच गावपातळीवर आधीच जनावरांचीसाठी देण्यात आलेल्या खोडयास शेड उभारणीसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Leave a Reply