अर्थखाते मागूनही मिळत नसल्याची सुनेत्रा पवारांची खंत:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- माझ्यापर्यंत त्यांची कोणतीही नाराजी आलेली नाही
![]()
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहे. सध्या पक्षवाढीसह स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र, उपमुख्यमंत्रिपद मिळूनही अजितदादांकडे असलेले महत्त्वाचे अर्थखाते अद्याप सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. अर्थखाते न मिळाल्यावरून सुनेत्रा पवार यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील मंत्री तसेच अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कांदा प्रश्नावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, सुनेत्रा पवार यांनी अर्थखात्यावरून व्यक्त केलेल्या कथित नाराजीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अद्याप तरी माझ्यापर्यंत त्यांची कोणतीही नाराजी आलेली नसून, त्या जेव्हा स्वतः याविषयी माझ्याशी बोलतील, तेव्हाच मी यावर माझे मत व्यक्त करेन, असे म्हटले आहे. पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली होती खंत 26 मे रोजी मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अर्थखात्याच्या वाटपावरून सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अजितदादांच्या काळात राष्ट्रवादीकडे असलेले हे महत्त्वाचे खाते आता पक्षाला परत मिळाले नसल्याची खंत सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या कथित नाराजीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, ‘अद्याप माझ्यापर्यंत अशी कोणतीही नाराजी आलेली नाही,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे अर्थखात्याच्या या मुद्द्यावरून आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी पाहायला मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अमित शहांसोबत विधानपरिषद निवडणुकांच्या विषयावर चर्चा दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, 17 जागांसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून, केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून आडले पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीबाबत मी पुन्हा सांगतो, आमचे जवळपास अॅग्रीमेंट झालेले आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर येथील जागा आम्हाला मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. राष्ट्रवादीने आमच्याकडे पुण्याची जागा मागितली आहे, सध्या याच गोष्टींवर आमचे आडले आहे, जे आम्ही सोडवून घेऊ. तसेच कठीण पेपर संपलाय, आता सोपा पेपरही आम्ही सोडवून घेऊ, टिकमार्क करायचे बाकी आहे, ते होऊन जाईल, असे फडणवीस म्हणाले.
