पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई: 104 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू:1.73 लाख नागरिकांना दिलासा; 5.5 कोटींहून अधिक निधी मंजूर

0
0b28156f-1b23-4200-ae6d-e3a4ff5e949f_1779886789094.jpg




पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १११ गावे आणि ४२६ वाड्यांना एकूण १०४ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकर फेऱ्यांमुळे सुमारे १ लाख ७३ हजार ५९१ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकर पुरवठा सुरू आहे. प्रशासन पाणी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. गरजेनुसार तात्काळ नवीन टँकर मंजूर केले जात आहेत, तसेच खाजगी विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. टँकरच्या फेऱ्या नियमित पूर्ण केल्या जात असून खेप पूर्ततेचे प्रमाण समाधानकारक आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने ४३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी सुमारे ५.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बंद असलेल्या किंवा कमी क्षमतेने सुरू असलेल्या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील. याव्यतिरिक्त, ६११ बोअरवेल दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी २.५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच, टंचाईग्रस्त गावांमध्ये अतिरिक्त जलस्रोत निर्माण करण्यासाठी ३१ नवीन बोअरवेल योजनांना २६.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed