सातारा क्राइम डायरी:मालगावात किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांत हाणामारी; एकावर गुन्हा

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-26t191059942_1779802921.jpg




सातारा तालुक्यातील मालगाव येथे शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण काशीद हे गावातील रस्त्याने जात असताना समीर पटेल याच्याशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. “टक लावून का पाहतोस?” या कारणावरून सुरू झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. दरम्यान, वाद सोडविण्यासाठी पुढे आलेल्या लक्ष्मी काशीद यांच्याशीही आरोपीने गैरवर्तन करून शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शिक्षक कॉलनीतील बंद घर फोडून चोरी; दागिन्यांसह मोठा लंपास सातारा शहरातील सदरबाजार परिसरातील शिक्षक कॉलनी येथे बंद असलेल्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. सौरभ चिखलीकर हे कराड येथे नातेवाईकांकडे गेले असताना त्यांच्या ‘उमंग’ या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचा हार, अंगठ्या, सोन्याच्या कॉईन्स तसेच चांदीची नाणी असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. वाहन आडवे लावल्याने वाद; महिलेशी गैरवर्तन, तिघांवर गुन्हा काळोशी फाटा परिसरात वाहन उभे करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी महिलेशी गैरवर्तन आणि हल्ल्याच्या आरोपाखाली तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेची गाडी आणि आरोपींचे वाहन समोरासमोर आल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. यावेळी महिलेला खाली पाडून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या गोंधळात महिलेच्या नातेवाईकांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ‘कार्यक्रमाला जातो’ सांगून घराबाहेर पडलेला युवक बेपत्ता वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेला युवक बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वैभव साठे हा रविवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही संपर्क न झाल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी युवकाचा शोध सुरू केला असून तपास सुरू आहे. मेडिकल कॉलेज परिसरात दोन गटांत पुन्हा संघर्ष; दोन्हीकडून तक्रारी मेडिकल कॉलेजसमोरील कॅनल परिसरात जुन्या कारणावरून दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही युवकांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. एका बाजूने शिवीगाळ आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून दुसऱ्या बाजूने धक्काबुक्की केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed