हर्षवर्धन सपकाळांकडून पंतप्रधानांवर अर्वाच्य भाषेत टीका:चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- सपकाळांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळिमा फासणारी
![]()
नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. या टीकेच्या निषेधार्थ आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कॉंग्रेसचे कर्तुत्वशून्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या दिल्लीतल्या नाकर्त्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याविषयी वापरलेली घाणेरडी भाषा ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारी आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ही व्यक्ती एखादा सामान्य कार्यकर्ता असता तर कदाचित कोणी दखलही घेतली नसती. पण दुर्दैवाने ते आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वावरत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातून काँग्रेसची विकृत आणि गलिच्छ राजकीय संस्कृती पुन्हा एकदा समोर आली आहे. राहुल गांधींपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांपर्यंत विरोधकांवर व्यक्तिगत पातळीवर घसरून बोलण्याची हीच परंपरा दिसते. तसेच कितनी आसानी से मशहूर किया है ख़ुद को, मैंने अपने से बड़े शख़्स को गाली दे कर…, अशा शायरीतूनही बावनकुळे यांनी टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्यांना स्वतःच्या मतदारसंघातील जनता विचारात नाही, ते देशाच्या सर्वाधिक लोकप्रिय नेतृत्वावर बोलून मथळे मिळवू पाहतात, हीच त्यांची राजकीय ऊंची आहे. महाराष्ट्राची जनता सुसंस्कृत आहे, सजग आहे आणि अशा घाणेरड्या, विकृत मानसिकतेच्या राजकारणाला कधीही स्वीकारणार नाही, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सपकाळ यांच्या व्यक्तव्याचा मी आणि आमचा पक्ष निषेध करतो, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नेमके काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ? चांदवडमधील शेतकऱ्यांच्या मोर्चात भाषण कराताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे. मी तुमचा कांदा खाल्ला आहे, मी बेइमानी करणार नाही. नालायक म्हणायचे ह***र म्हणायचे, कांदाखोर म्हणायचे, असे हे नालायक सरकार आहे. फडणवीस तर गद्दार माणूस आहे. 24 रुपयांनी कांदा खरेदीचे आश्वासन दिलेले होते. फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि लग्न केले. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत. पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मोदी यांनी आजू-बाजूच्या देशांसोबत भंडण घेतले आहे. जो पर्यंत **** खुर्चीवर आहे तो पर्यंत कांदा आयात होणार नाही. बांगलादेश श्रीलंका आपला कांदा घेणार नाही. नरेंद्र हा **** आहे. एपस्टीन फाईलमध्ये मोदींनी काय काय केले ज्यामुळे ते ट्रम्प यांचे ऐकत आहेत? मोदींमुळे आपले चांगले होऊ शकत नाही. कांदा खरेदी आता एपीएमसी मधेच झाली पाहिजे. झोपेच सोंग करणारे खोट सरकार आहे. मोदींना बैलगाडीत बसून त्याची हिमालयात विल्हेवाट लावा, अशी वादग्रस्त टीका सपकाळ यांनी केली आहे.
