एकनाथ शिंदेंना मनवण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी:विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी युतीत हालचाली

0
730-x-548-new-2026-05-26t084442977_1779767264.jpg




स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच्या वाटपावरून जोरदार चर्चा रंगली आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. 1 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांनाही वेग आला आहे. विधान परिषद निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला 4 जागा देण्याची चर्चा सुरू असली तरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने भाजपसमोर 6 जागांचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागांवर दावा कायम ठेवला आहे. तर भाजपकडून अधिकाधिक जागा आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत महायुतीतील प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवताना दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महायुतीत कोणताही वाद टोकाला जाऊ नये आणि सर्व पक्षांमध्ये समन्वय राखला जावा, यासाठी भाजप नेतृत्वाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा वाढू लागल्यानंतर भाजपने समेटाची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे यांची नाराजी दूर करून तोडगा काढण्याची जबाबदारी रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महायुतीमध्ये सुवर्णमध्य साधत निवडणुकीत एकत्रित ताकद दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. अंतिम फॉर्म्युला काय ठरणार महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरणार आणि शिवसेनेच्या मागण्यांवर भाजप कितपत सकारात्मक भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत महायुती एकसंघ राहणार की अंतर्गत नाराजी आणखी वाढणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed