कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ
![]()
राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावरून महायुतीत हालचाली वेगाने सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कोणालाही सुगावा लागू न देता एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. त्यावेळी अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र वेळ न मिळाल्याने त्यांना महाराष्ट्रात परतावे लागले. त्यानंतरही शिंदे सातत्याने दिल्लीशी संपर्कात होते. अखेर शनिवारी रात्री अमित शहा यांच्या कार्यालयातून भेटीसाठी संदेश मिळाल्यानंतर शिंदे यांनी तातडीने खासगी विमानाने दिल्ली गाठली. विशेष म्हणजे या दौऱ्याची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यांच्या सोबत कोणताही अधिकृत सहाय्यक किंवा मोठा ताफा नव्हता. दिल्लीतील या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे नाराज आणि अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये शिंदे गटाची कोंडी होत असल्याची भावना त्यांच्या गटात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षविस्तार आणि स्वतःची ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भविष्यातील राजकीय दिशा, विधान परिषद निवडणूक आणि पक्ष विस्ताराच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व हालचालींबाबत भाजप आणि शिंदे गटाकडून मौन पाळण्यात आले आहे. त्यामुळे या भेटीमागील खरे कारण काय, याबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यातील एक मोठे शिक्षणसम्राट आणि शिवसेनेचे माजी मंत्री उपस्थित असल्याची माहितीही समोर आली आहे. काही काळापासून या नेत्याचे आणि शिंदे यांचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे अचानक त्यांनी शिंदेंसोबत दिल्ली गाठल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. या भेटीनंतर शिंदे दिल्लीहून बंगळुरूला रवाना झाले आणि त्यानंतर ठाण्यात परतल्याचे सांगितले जात आहे. ऑपरेशन टायगरला हिरवा कंदील मिळणार का राज्यातील सत्तासमीकरणे, महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-अमित शहा भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या भेटीनंतर महायुतीत नवे बदल होणार का, शिंदे गटाला अधिक ताकद मिळणार का आणि ‘ऑपरेशन टायगर’ला हिरवा कंदील मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
