देशात कोरोनापेक्षा 20 पट भयंकर परिस्थिती उद्भवणार:इंधन दरवाढीवर विरोधकांचा घणाघात; मोदी जनतेला 'स्लो पॉईजन' देत असल्याचा दावा
![]()
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 2.72 व 2.81 रुपयांची वाढ केली. गत 10 दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. त्यामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना जबर झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरवाढीच्या माध्यमातून जनतेला स्लो पॉईजन देत असल्याचा आरोप केला आहे. पेट्रोल आणि डिझेल आजपासून अनुक्रमे प्रति लीटर 2.72 व 2.81 रुपयांनी महाग झाले आहे. नवे दर आज 25 मे पासून तात्काळ लागू झाले आहेत. मागील 10 दिवसांत करण्यात आलेली ही चौथी दरवाढ आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दरवाढीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या प्रकरणी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी व डॉक्टर मनमोहन सिंग यांची आठवण काढली. कोरोनापेक्षा 20 पट भयंकर परिस्थिती उद्भवणार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही मोदींच्या धोरणामुळे देशात कोरोना काळापेक्षा 20 पट वाईट परिस्थिती निर्माण होणार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, सध्याची इंधन टंचाई कृत्रिम नाही. काल अमेरिकेने भारतावर आणखी एक निर्णय लादला. भारताने इराण व रशियाकडून तेल खरेदी करू नये. अमेरिकेचे तेल कितीही महाग असले तरी ते तेल भारताने खरेदी केले पाहिजे, असा फतवा अमेरिकेने काढला आहे. त्यामुळे ही टंचाई कृत्रिम नाही. ही टंचाई निर्माण होण्यास सरकार जबाबदार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल – डिझेल मिळत नाही. उद्या पेट्रोल 150 रुपयांवर जाईल आणि डिझेलही 140 रुपयांवर जाईल. पुढच्या महिन्याभरात ही परिस्थिती उद्धवेल. फक्त एवढेच आहे की, एकाचवेळी वाढवायचे नाही, म्हणून एक-दोन रुपयांनी वाढ करणे सुरू आहे. भविष्यात 8 दिवसांनी दरात प्रत्येकी 5 रुपयांनी वाढ होताना दिसेल. हे लपून राहणार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. कोरोनामध्ये जी परिस्थिती होती, त्याच्या 20 पट परिस्थिती वाईट होईल. पूर्ण देश उद्ध्वस्त होईल. त्याचे कारण असे आहे की, एपस्टीन फाईल व अदानींचे प्रकरण यामुळे देश अमेरिकेच्या दावणीला बांधण्यात आला आहे. ट्रम्प म्हणतात की, मोदींना फोन कुठे व करावा केव्हा करावा हे ठावूक आहे. ते योग्यवेळी मला फोन करतात. याचा अर्थ असा आहे की, भारताच्या पंतप्रधानांचा हात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दगडाखाली ठेवला आहे. तो काढता येत नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. परिस्थिती उद्या भयावह होणार आहे, असे वडेट्टीवार आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कच्चे तेल स्वस्त तरीही दरवाढ का? विजय वडेट्टीवार आपल्या अन्य एका ट्विटद्वारे म्हणाले, ब्रेंट क्रूड आंतरराष्ट्रीय बाजारात $100 च्या खाली घसरलंय, कच्चं तेल स्वस्त झालंय. पण भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत! गेल्या 10 दिवसांत इंधन दरवाढ तब्बल 7 रुपयाने झालीये. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय? क्रोनोलॉजी समजून घ्या. जागतिक बाजारात क्रूड महागलं की लगेच सरकारला जागतिक संकट आठवतं, अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचं रडगाणं सुरू होतं. जागतिक बाजारात क्रूड स्वस्त झालं की सरकार एकदम मौनात जातं, दरकपातीचा पत्ताच नसतो. दरवाढ करायची असेल तर ती एका रात्रीत, तात्काळ होते पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यावर दरकपात मात्र कधीच होत नाही. हा डायनॅमिक प्रायसिंगचा खेळ फक्त जनतेला लुटण्यासाठीच सुरू आहे का? देशातील जनता मूर्ख नाहीये. निवडणुका आल्या की पेट्रोलचे दर जैसे थे असतात आणि निवडणुका संपल्या की जनतेच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक सुरू होतो! म्हणजेच भाजपसाठी जनता ही फक्त मतदान करण्यापुरती आणि नंतर वसुली करण्यासाठी ATM मशीन ठरली आहे. मोदी सरकारने स्पष्ट उत्तर द्यावं. क्रूड स्वस्त झाल्यावरही भारतात पेट्रोल-डिझेल महाग का? जनतेच्या घामाचा पैसा नक्की कुठे जातोय? की काही मोजक्या उद्योगपती मित्रांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हा देश लुटला जातोय? असे ते म्हणालेत.
ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है – सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आम्हाला पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही. आम्ही मागील 6 महिन्यांपासून बोलत आहोत. सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी सतत मागणी करत आहोत. पंतप्रधान परदेशात जाण्यापूर्वी आम्ही मागणी करत होतो, मात्र अद्याप बैठक लावलेली नाही. ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. रस्त्यावर उतरा किंवा केवळ प्रार्थना करा – रोहित पवार रोहित पवार म्हणाले, आज पंडीत नेहरु किंवा स्व. इंदिरा गांधी किंवा अटलबिहारी वाजपेयी किंवा डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखं जागतिक प्रश्नात हस्तक्षेप करु शकणारं उत्तुंग नेतृत्त्व नसण्याचा जबर फटका देशाला सहन करावा लागतोय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे अडीच रुपये वाढ झाली असून रोजच होणारी ही दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं लक्षण आहे. या दरवाढीमुळं देश ठप्प होत असताना सरकार मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसलंय. यावर उपाययोजना करण्यास सरकार पूर्णतः असमर्थ ठरत असल्याने हा देश वाचावा यासाठी आपण एकतर केवळ प्रार्थना करु शकतो किंवा व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारु शकतो. चॉईस जनतेचा आहे.
गिरीश महाजनांचा घेतला समाचार रोहित पवार यांनी यावेळी ‘रांगेत उभे राहणारे काळा बाजार करणारे’ असल्याचा दावा करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्याही विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना ‘रांगेत उभे राहणारे काळा बाजार करणारे आहेत,’ हे मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील आहे. रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळाबाजार करायला ते काही सत्तेतील मंत्री नाहीत. महाकुंभमेळ्याच्या कामात निविदा वाढवून रिंग करून किती काळाबाजार केला हे जगजाहीर आहे. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये केलेल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच पुराव्यासकट बोलणार आहे..!
मोदीजी देशवासीयांना ‘स्लो पॉईजन’ देत आहेत -रोहिणी खडसे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला. झोपलेले असाल तर जागे व्हा ! तुम्हाला आणखी एक झटका बसलाय. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी. मागील 10 दिवसांत ही चौथी वाढ आहे. आम्ही आधीच सांगितले होते की निवडणुकीचा संपूर्ण खर्च भाजप सरकार हळूहळू वसूल करणार आहे. हा चौथा हफ्ता असून मोदीजी देशवासीयांना ‘स्लो पॉईजन’ देत आहेत, असे त्या म्हणाल्या.
दरवाढ शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक आघात करणारी – रोहित पाटील आमदार रोहित पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, दोन आठवड्यांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. शेतीच्या मशागतीचा हंगाम सुरू असताना डिझेल-पेट्रोलचे वाढते दर शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आघात ठरत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजीपाला, धान्य, दूध, वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याचा फटका सामान्य कुटुंबांना बसणार आहे. अशा संवेदनशील काळात सरकारने जनतेला दिलासा देण्याऐवजी वारंवार दरवाढ करून आर्थिक संकट अधिक गंभीर होत आहे.
इंधन पुरवठ्यावर प्रशासनाची करडी नजर – श्वेता महाले दुसरीकडे, भाजप आमदार श्वेता महाले यांनी इंधन पुरवठ्यावर प्रशासनाची करडी नजर असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी चिखली तहसील प्रशासनाने खालील मोठे निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. हे ही वाचा… परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी हाणामारी:’हेच का भाजपचे अच्छे दिन’ म्हणत काँग्रेसची सरकारवर टीका; VIDEO व्हायरल राज्यातील बहुतांश भागात पेट्रोल – डिझेलच्या टंचाईने स्थिती बिकट बनली आहे. आता परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी नागरिकांत चक्क हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचा सविस्तर
