मराठवाड्यात शिवसेनेची कोंडी:विधान परिषदेच्या 4 पैकी 3 जागांवर भाजपचा, एकावर ‘राष्ट्रवादी’चा दावा, मंत्री शिरसाट म्हणतात, समन्वय समिती निर्णय घेईल
![]()
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेची पारंपरिक ताकद असलेल्या छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत सध्या शिवसेनेची (शिंदे गट) मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या जोरावर या जागांवर आपला दावा ठोकल्यामुळे शिंदेसेनेची अडचण झाली आहे. मनपा आणि जिल्हा परिषदेतील सत्ता गमावल्यानंतर आता विधान परिषदेच्या या जागा राखतानाही शिवसेनेला संघर्ष करावा लागत आहे. विभागात भाजपने 3 व राष्ट्रवादीने एका जागेवर दावा केला आहे. शिवसेना मनपा आणि जिल्हा परिषदेत भाजपविरोधात लढली होती. जिल्हा परिषदेत भाजपने शिवसेनेला सत्तेत न घेता सत्ता काबीज केली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चुरशीची ठरत आहे. भाजप, राष्ट्रवादीचे पारडे जड छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे संख्याबळ शिवसेनेच्या तुलनेत दुप्पट आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 95 तर भाजपचे 140 सदस्य आहेत. जालन्यात शिवसेनेकडे 21 तर भाजपकडे 124 सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांची एकत्रित बेरीज पाहता भाजपकडे 264 तर शिवसेनेकडे 116 सदस्य आहेत. भाजपला हव्यात 3 जागा नांदेड, लातूर-धाराशिव-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना अशा जागांवर भाजपने दावा केला आहे. ओबीसी विकासमंत्री अतुल सावे म्हणाले, या तिन्ही जागांवर आमचे संख्याबळ अधिक असल्यामुळे या जागा पक्षाकडे मागितल्या आहेत. संभाजीनगर-जालन्यामध्ये मित्रपक्षाच्या तुलनेत दुप्पट संख्या आहे. त्यामुळे ही जागा आम्ही मागितली आहे. परभणी-हिंगोलीवर राष्ट्रवादीचा दावा परभणी-हिंगोली मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले की, परभणीत 90 आणि हिंगोलीत 41 असे राष्ट्रवादीचे 131 संख्याबळ आहे. या भागात भाजपचे 99 आणि शिवसेनेचे 77 सदस्य आहेत. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. नांदेडमध्ये भाजपची संख्या जास्त नांदेडमध्ये एकूण जागांपैकी भाजपकडे 144, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 72, काँग्रेस 80 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 18 सदस्य आहेत. येथे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 131 आहे. या जागेवरून गेल्या 2 टर्मपासून निवडून आलेले अमर राजूरकर पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दोन्ही जागांवर आमचा दावा कायम छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे गड राहिले आहेत. येथे शिवसेनेची पारंपरिक ताकद आहे. जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर तीनही पक्षांची समन्वय समिती योग्य तो सकारात्मक निर्णय घेईल. – संजय शिरसाट, नेते व पालकमंत्री, शिवसेना स्वबळाचा निर्णय नडला राज्यातील सत्तेत शिंदेसेना भाजपच्या नेतृत्वाखाली सहभागी आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने दमदार कामगिरी केली असली, तरी ही निवडणूक महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकत्र लढवली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्ष एकमेकांसमोर लढण्यास उतरले. शिवसेनेने भाजपशी युती केली नाही. वस्तुस्थिती विचारात न घेता जागांची मागणी केल्याने युती तुटली. परिणामी भाजपला शिवसेनेवर कुरघोडीची संधी मिळाली. आता त्याचा पुढचा परिणाम म्हणून विधान परिषदेचे हक्काचे मतदारसंघही शिवसेनेच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत.
