साताऱ्यातून चालत होते अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’:17 जणांवर पोलिसांची कारवाई; बोगस कॉल सेंटर उध्वस्त

0
new-project-2026-05-23t195242093_1779546481.jpg




अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अमेरिकन नागरिकांचा डेटा समाविष्ट आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी” या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून हे कॉल सेंटर सुरू होते. नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या छाप्यात कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य, अमेरिकन नागरिकांचे संपर्क तपशील आणि २१ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. या प्रकरणात सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याच्यासह विरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनिष जोशी, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहान, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दिपक खंडारे, मोहंमद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दिपेन जाधव आणि लेबीन सायमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय चार महिलांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. प्राथमिक तपासात आरोपी अमेरिकन नागरिकांना फोन करून “तुमच्या नावाने अॅमेझॉनवरून खरेदी झाली आहे” असे सांगत होते. संबंधित व्यक्तीने व्यवहार नाकारल्यास बनावट ऑर्डर क्रमांक व मेसेज पाठवून विश्वास निर्माण केला जात होता. त्यानंतर “ऑर्डर रद्द करण्यासाठी गिफ्ट कार्ड खरेदी करा” किंवा “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत पैसे उकळले जात होते. फसवणुकीसाठी प्रामुख्याने डॉलर व्यवहारांचा वापर केला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अमेरिकन तपास यंत्रणांशी समन्वयाची शक्यता या सायबर फसवणुकीचे धागेदोरे परदेशाशी संबंधित असल्याने सातारा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर तपास संस्थांची मदत घेतली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. “डिजिटल अरेस्ट”, बनावट ई-कॉमर्स व्यवहार आणि गिफ्ट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. आरोपींची नावे वरील आरोपींना दिनांक २५ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed