मोर्शीत वारंवार वीजपुरवठा खंडितची समस्या:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर मोर्चा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
![]()
मोर्शी शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येविरोधात आज शनिवारी डोंगरयावली, हिवरखेड, दापोरी, घोडदेव आणि सालबर्डी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी मोर्शी शहर आणि तालुक्यातील विविध वीज समस्या मांडल्या. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील सिंगल फेज वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, डोंगरयावली येथील मंजूर उपकेंद्र सुरू न होणे, हिवरखेड-दापोरी कृषी फिडर लाईनची अपूर्ण दुरुस्ती आणि दापोरी गावठाण फिडरवरील विस्कळीत वीजपुरवठा या प्रमुख समस्यांचा समावेश होता. आंदोलकांनी ‘शेतकऱ्यांना न्याय द्या’, ‘महावितरण प्रशासन जागे व्हा’ अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी डोंगरयावली येथील सबस्टेशनचे काम तातडीने पूर्ण करून मोर्शी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या मोर्चामध्ये संजय पांडव, विनोद ठोके, अशोक राऊत, मंगेश चवळे, स्वप्नील निंबोरकर, प्रवीण रामटेके, धनंजय अमदारे, मयूर ढवळी, मनीष गुडधे, गजानन वानखडे, शेखर विघे, सूरज महल्ले, धीरज महल्ले, सागर चौधरी, गौरव सोनारे, शुभम मिश्रा, अन्वर खान, अमोल ठोके, सौरभ काळे, आयुष लांडे, राज माकोडे, चेतन माकोडे, कुणाल म्हाला, सौरभ बारमासे, संकेत बारमासे, अनुप केवतकर, परिमल माकोडे, सुदेश हटवार यांच्यासह अनेक शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते. कार्यकारी अभियंत्यांनी मोर्चाची दखल घेत डोंगरयावली येथील सबस्टेशनचे काम २० दिवसांत सुरू करून नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच, मोर्शी शहर व तालुक्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करून ग्राहकांच्या समस्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
