डोंबिवलीत आंतरजातीय विवाहाला टोकाचा विरोध:कोर्ट मॅरेज झालेल्या पत्नीला हळदीच्या दिवशीच माहेरच्यांनी पळवले, पतीची पोलिसांत धाव

0
db-temp-cover-marathi-2026-05-23t170056531_1779535966.jpg




एकीकडे ‘पुरोगामी महाराष्ट्र’ आणि ‘जातीमुक्त समाजा’च्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र जातीची पाळेमुळे आजही समाजात किती घट्ट आणि विषारी स्वरूपात रुजलेली आहेत, याचे एक अतिशय धक्कादायक वास्तव डोंबिवलीत समोर आले आहे. कॉलेजपासूनचे आठ वर्षांचे प्रेम, त्यानंतर न्यायालयात कायदेशीर ‘कोर्ट मॅरेज’ होऊनही, केवळ मुलगा ‘बौद्ध’ (दलित) समाजाचा आहे म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जबरदस्तीने गायब केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली परिसरात राहणारा ओंकार आणि पीडित तरुणी यांचे कॉलेज जीवनापासून म्हणजेच गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. मुलीच्या घरच्यांनी जेव्हा तिच्यासाठी इतरत्र स्थळे पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा तिने धीर करून कुटुंबाला आपल्या प्रेमाची कबुली दिली. मात्र, मुलगा दलित समाजाचा असल्याचे समजताच मुलीच्या आई-वडिलांनी आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध करत तिला घरात बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. कोर्ट मॅरेजनंतर कुटुंबीयांनी रचला ‘विश्वासघाताचा’ डाव! घरच्यांचा विरोध पाहाता, या प्रेमी युगुलाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले. दोघांनी ठाणे न्यायालयात जाऊन रीतसर कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर दोन दिवस ते एकत्रही राहिले. मात्र, त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी अचानक मवाळ भूमिका घेत एक नवी चाल खेळली. “समाजासाठी आपण चारचौघांत रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावू,” असे सांगत मुलीच्या कुटुंबीयांनी व मुलाची समजूत काढली. त्यांच्यावर विश्वास ठेवून ओंकारने स्वतः हॉलचे पैसे भरले आणि २४ मे २०२६ चा लग्नाचा मुहूर्त ठरला. २१ मे रोजी हळदीच्या विधीची तयारी सुरू असतानाच, काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आल्याने ओंकारने पोलिसांना सोबत घेऊन मुलीचे घर गाठले. मात्र, तिथे पोहोचताच सर्वांचेच पाय जमिनीला खिळले; मुलीच्या घराला मोठे कुलूप ठोकलेले होते आणि तिचे संपूर्ण कुटुंब मुलीसह गायब झाले होते. ‘चार चौघांत लग्न लावू’ म्हणून केला विश्वासघात! याबाबत ओंकारने सांगितले की, “आम्ही कोर्ट मॅरेज केले होते. पण तिच्या आई-वडिलांनी आणि मामाने आमच्याशी गोड बोलून समजूत काढली. ‘समाजासाठी आणि अब्रूसाठी आपण चार चौघांत रितीरिवाजाप्रमाणे तुमचे लग्न लावून देऊ’ असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी स्वतः लग्नकार्यासाठी हॉल बुक केला, त्याचे पैसे भरले आणि लग्नाची सर्व तयारी केली. मात्र, २१ मे रोजी हळदीच्या दिवशीच त्यांनी माझ्या पत्नीला जबरदस्तीने कुठेतरी गायब केले आणि स्वतःच्या घराला टाळे लावून पळून गेले. माझ्या पत्नीच्या जिवाला काही बरे-वाईट झाले, तर त्याला तिचे आई-वडील आणि मामाच सर्वस्वी जबाबदार असतील.” मानपाडा पोलिसांत ‘मिसिंग’ची तक्रार; शोध सुरू या धक्कादायक प्रकारानंतर ओंकारने तातडीने मानपाडा पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची (Missing) अधिकृत तक्रार नोंदवली आहे. “२१ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी गायब झाल्याची तक्रार पतीकडून प्राप्त झाली आहे. आंतरजातीय विवाहाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच तिचा शोध घेतला जाईल,” असे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed