[ads1]
NCMC कार्ड सक्तीचा गोंधळ थांबवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळत एसटी महामंडळाने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड सक्तीचे केल्याने राज्यभर प्रवाशांचे हाल होत असल्याचे
.
जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, 2024 साली विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महायुती सरकारने महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची घोषणा केली. आता ऐन गणेशोत्सवात एसटी महामंडळाने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड सक्तीचे केल्याने राज्यभर प्रवाशांचे हाल होत आहेत.
कार्डाची सक्ती कशासाठी?
पुढे जयंत पाटील म्हणाले, कुठे सर्व्हर डाऊन, कुठे कार्डांचा तुटवडा तर कुठे रिचार्जच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना हक्काची सवलत न मिळता पूर्ण तिकीटाचे पैसे मोजावे लागत आहेत. पण महिलांना सवलत देताना कार्डाची सक्ती कशासाठी? हाच मूळात प्रश्न आहे. लाभार्थी महिला प्रत्यक्ष बसमध्ये उपस्थित असतानाही तिची सवलत कागदी-तांत्रिक अटींमध्ये अडकवणे, हे पूर्णपणे विसंगत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
कार्ड सक्ती तात्काळ रद्द करावी
मूळात सरकारची कल्पना हास्यास्पद आहे. शासनाने ही जाचक कार्ड सक्ती तात्काळ रद्द करून महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच सवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी करणारे पत्र देखील जयंत पाटील यांनी परिवहन मंत्री आणि मुख्य सचिवांना दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
प्रवाशांची गैरसोय
दरम्यान, 1 सप्टेंबरपासून एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने NCMC कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू होताच प्रवाशांच्या सोयीपेक्षा गैरसोयच अधिक वाढल्याचे चित्र आहे. कार्ड मिळवणे, ते वेळेवर रिचार्ज करणे, सर्व्हर डाऊन असणे आणि इतर तांत्रिक बिघाडांमुळे सवलतधारक प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद
एसटी महामंडळाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 कोटी 11 लाखांहून अधिक प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. परंतु, प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर अनेक आगारांमधील सर्व्हरवर प्रचंड ताण येत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांकडे कार्ड असूनही ते रिचार्ज न होणे किंवा मशीनने ते न स्वीकारणे यामुळे एसटीमध्ये प्रवासी आणि वाहक यांच्यात वारंवार वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. या संपूर्ण गोंधळाचा सर्वाधिक फटका महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
कुडाळमध्ये 75 वर्षांच्या वृद्धाला बसमधून उतरावे लागले
या तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांचे कसे हाल होत आहेत, याचा प्रत्यय कुडाळ-मालवण मार्गावर आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, NCMC कार्ड असूनही रिचार्ज प्रक्रियेतील तांत्रिक समस्येमुळे एका 75 वर्षीय वृद्धासह काही महिलांना सवलतीचे तिकीट देण्यास नकार देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रवाशांना अखेर बसमधून खाली उतरावे लागले. कार्ड सक्तीचे करूनही जर वेळेवर रिचार्ज करता येत नसेल आणि त्याचा प्रवासात उपयोगच होणार नसेल, तर अशा सक्तीचा फायदा काय? असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
[ads2]
















Leave a Reply