[ads1]
लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने केलेल्या धडक कारवाईत एकूण १६ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४,४२,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे आणि कारवाई:
खरोळा येथे जुगार अड्ड्यावर छापा: दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खरोळा येथील एका रिकाम्या प्लॉटमध्ये लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर विशेष पथकाने छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या ७ इसमांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १०,७०० रुपयांची रोकड, ५ मोबाईल आणि ६ मोटार सायकली असा एकूण ३,२७,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५३/२०२६ कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गंजगोलाई परिसरात मटका बुकींवर कारवाई: पथकाने गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजगोलाई परिसरात दोन ठिकाणी मटका बुकींवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १०,३५० रुपयांची रोकड, ४०,००० रुपयांचे ४ मोबाईल आणि ५०,००० रुपयांचे संगणक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६२०/२०२६ कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये व गुन्हा रजिस्टर नंबर ६२१/२०२६ कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम ४-१-a, ४-१-g महाराष्ट्र लॉटऱ्या आणि बक्षीस स्पर्धा अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
कॉईल नगर येथे मटका बुकीवर कारवाई: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉईल नगर येथे भंगार दुकानाच्या शेजारी असलेल्या देशमुख यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका बुकीवर कारवाई करण्यात आली. तेथून ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७,३०० रुपयांची रोकड आणि ७,००० रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४३८/२०२६ कलम १२ अ, ४ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकूण जप्त मुद्देमाल: या तिन्ही कारवाईत पथकाने एकूण १६ आरोपींकडून २८,३५० रुपयांची रोकड, १० मोबाईल, ६ मोटार सायकली आणि संगणक साहित्य असा एकूण ४,४२,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाईत सहभागी पथक: सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह प्रदीप खानसोळे, गणेश राठोड आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
अवैध व्यवसायांच्या विरोधात खबर हेल्पलाईन: अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचवता यावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाईनवरून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
Post Views: 28
[ads2]
















Leave a Reply