Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? तारीख आली समोर
Maharashtra Monsoon Update | राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा वाढली आहे. जून महिना सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असताना यंदा महाराष्ट्रात पाऊस नेमका कधी दाखल होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी नैऋत्य मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये (Kerala) प्रवेश करतो आणि त्यानंतर हळूहळू देशाच्या इतर भागांकडे सरकतो. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होत असतो. मात्र, यंदा 26 मेपर्यंतच मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्याची सुरुवात यावर्षी वेळेआधी होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये आगमनानंतर मान्सून कर्नाटक (Karnataka), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मार्गे महाराष्ट्रात (Maharashtra) पुढे सरकणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. मान्सूनच्या प्रवेशावेळी मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Monsoon Update | शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पाहण्याचा सल्ला :
महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर 15 जूनपर्यंत मान्सून मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि गुजरात (Gujarat) भागात पोहोचू शकतो. त्यानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) 25 जून ते 5 जुलैदरम्यान मान्सून पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा देशभरात पावसाची प्रगती तुलनेने वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज काळजीपूर्वक लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण, मान्सून आगमनाची तारीख आणि पुढील हवामानस्थिती पाहूनच शेतीची कामे सुरू करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. योग्य नियोजन केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते.
