हिंगोली-कळमनुरी मार्गावर भीषण अपघात:उभ्या ट्रेलरला कारची पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू
![]()
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता गावाजवळ भरधाव कार उभ्या ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी ता. 21 मध्यरात्री्च्या सुमारास घडली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील साईनगर भागातील रहिवासी असलेले सुरज संजय साळवे (26) व अरुण भिवाजी आम्ले (40) हे दोघे त्यांच्या कारने गुरुवारी सायंकाळी हिंगोलीत आले होते. यावेळी सुरज यांचा पुतण्या एका रुग्णालयात असल्याने त्याची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही कळमनुरीकडे निघाले होते. दरम्यान, त्यांची कार हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता शिवारात आली असतांना समोर वाहन दुरुस्तीचे काम करीत असलेल्या ट्रेलरला कार पाठीमागून जाऊन धडकली. यामध्ये वाहनाच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक भालचंद्र मेथेकर, जमादार अनिल डुकरे, बापुराव चव्हाण, कुटे, रामराव चिभडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील सुरज साळवे व अरुण आम्ले यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या प्रकरणी अद्यापपर्यंत हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
