धरणगावात इंधन टंचाईचे विदारक चित्र:डिझेलसाठी शेतकरी दुपारपासून उपाशीपोटी रांगेत; पंपचालकाचे मन हेलावले, रात्री दिले जेवण
![]()
आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे अत्यंत गंभीर आणि विदारक पडसाद आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संकटामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. डिझेल मिळवण्यासाठी बळीराजाला चक्क पेट्रोल पंपावरच रात्रभर मुक्काम ठोकण्याची वेळ आली आहे. बुधवारी रात्री याच इंधन टंचाईच्या गर्दीतून एक अनोखे आणि हृदयस्पर्शी चित्र समोर आले; दुपारपासून उपाशीपोटी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांसाठी एका पेट्रोल पंप चालकाने चक्क पंपावरच जेवणाची सोय केली आणि तिथे रात्री पंगती रंगल्या. धरणगाव परिसरातील शेतकरी आणि वाहनधारकांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून इंधनासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशातच, बुधवारी रात्री उशिरा डिझेलचा टँकर येणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ही संधी हातची जाऊ नये म्हणून परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी दुपारपासूनच ट्रॅक्टर आणि कॅन घेऊन धरणगावमधील पेट्रोल पंपांवर किलोमीटर लांब रांगा लावण्यास सुरुवात केली. दिवसभर प्रतीक्षा, शेवटी पंपावरच बसल्या पंगती! दुपारपासून रात्रीचे १०-११ वाजले तरी डिझेलच्या प्रतीक्षेत कोणीही रांगेतून हलण्यास तयार नव्हते. ऐन मशागतीचे दिवस असल्याने डिझेल मिळवणे अत्यंत गरजेचे होते. कडक उन्हात आणि नंतर रात्रीच्या अंधारात अनेक तास शेतकरी उपाशीपोटी उभे असल्याचे पाहून येथील ‘पवार पेट्रोल पंपाचे’ मालक आणि कर्मचारी यांचे मन हेलावले. त्यांनी सामाजिक भान जपत तात्काळ पंपाच्या आवारातच ‘खिचडी’ बनवून घेतली आणि रांगेत थांबलेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना सन्मानाने जेवण दिले. ‘पंपचालकाला दया आली, सरकारला कधी येणार?’ शेतकऱ्यांचा सवाल “आम्ही शेतीची कामं सोडून दुपारपासून इथे डिझेलसाठी रांगेत उभे आहोत. आमचे हे हाल पाहून सरकार किंवा प्रशासनाला काही वाटत नाही. पण या पेट्रोल पंप चालकाला आमची दया आली आणि त्यांनी आमच्यासाठी खिचडी बनवून दिली. निदान आतातरी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी,” अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली. अन्नदात्याचे हाल पाहवले नाही पवार पेट्रोल पंपाचे चालक पवार म्हणाले, “दुपारी ४ वाजेपासून शेतकरी बांधव उपाशीपोटी इथे थांबले होते. रात्र झाली तरी डिझेलच्या अपेक्षेने कोणीही घरी जायला तयार नव्हते. सध्या शेतीची कामं ऐन रंगात आहेत, त्यामुळे डिझेलची गरज आम्ही समजू शकतो. आमच्या अन्नदात्याचे हाल पाहवले नाहीत, म्हणून आम्ही पंपावरच खिचडी तयार करून सर्वांच्या जेवणाची सोय केली. इंधनाची मोठी टंचाई आहे, सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.” ग्रामीण भागातील इंधन टंचाई बिकट आखाती देशांमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, ऑइल कंपन्यांकडून ग्रामीण भागातील पुरवठ्याला मोठी कात्री लावली जात असल्याचे बोलले जात आहे. धरणगावातील या घटनेने ग्रामीण भागातील डिझेल टंचाई किती टोकाच्या पातळीवर पोहोचली आहे, हे संपूर्ण राज्यासमोर आणले आहे. जर पुढील दोन दिवसांत इंधनाचा सुरळीत पुरवठा झाला नाही, तर शेतकऱ्यांची खरीप पूर्वमशागतीची कामे पूर्णपणे ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे.
