Thackeray Group Warns Admin Over NEET Paper Leak; Shiv Sena Style Protest!
![]()
नीट पेपर फोडून लाखो विद्यार्थ्यांच्या करीयरची राखरांगोळी करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरावर तातडीने बुलडोझर फिरवावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
.
या संदर्भात ठाकरे गटाच्या शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील सावंत, उध्दवराव गायकवाड, गणेश शिंदे, शंकर घुगे, भानुदास जाधव, युवासेना विस्तारक दिलीप घुगे, विठ्ठल चौतमल, संतोष देवकर, आनंदराव जगताप, ज्ञानेश्वर झटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी नांदेड येथे शिकवणी क्लासेसला जातात. पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी पालक पोटाला चिमटा घेऊन क्लसेसचे शुल्क भरतात. मात्र नीट पेपर फुटीमुळे मोटेगावकर क्लासेसचे बिंग फुटले आहे. या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.
यामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागले असून पेपर फोडून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या करीयरची राखरांगोळी केली आहे. त्यामुळे नीट परिक्षेचा पेपर फोडणाऱ्यांची सखोल चौकशी करावी. यामध्ये दोषी आढळून आलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावीच पण या सोबतच त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवावा. ज्यामुळे पुन्हा असे प्रकार करण्यास कोणीही धजावणार नाही. शासनाने या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
या शिवाय आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पेरणीसाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे पेरणीसाठी उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपावर पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याची मागणीही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
