'हिंद केसरी'च्या फायनलमध्ये 'इल्लीगल होल्ड':पैलवान पृथ्वीराज मोहोळ याचा आरोप; विजयी महेंद्र गायकवाडच्या विजयावर प्रश्नचिन्ह
![]()
साताऱ्यात पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘इल्लीगल होल्ड’ अर्थात ‘हात पिरगळल्याचा’ प्रकार घडल्याचा आरोप पराभूत पैलवान पृथ्वीराज मोहोळने केला आहे. या आरोपामुळे हिंद केसरी ठरलेल्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात नुकताच 52 व्या हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना झाला. त्यात महेंद्र गायकवाडने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याला पराभवाची धूळ चारली. गायकवाडने अवघ्या 20 सेकंदांतच पृथ्वीराजवर विजय मिळवला. पण आता या स्पर्धेत इल्लीगल होल्ड झाल्याचा आरोप करत गायकवाडच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महेंद्र गायकवाडवर गंभीर आरोप पृथ्वीराज मोहोळने याविषयी बोलताना सांगितले की, महेंद्र गायकवाडच्या दोन्ही हाताने माझा हात पकडला गेला आणि पिरगळला गेला. त्याला दुखापतीचा डाव करायचा होता. तो त्या डावात यशस्वी झाला. त्यामुळे मला पुढची कुस्ती खेळताच आली नाही. हात पिरगळला गेल्यामुळे मला हातच उचलता आला नाही. मी या प्रकरणी फेडरेशनकडे तक्रार केली आहे. पण मला संबंधित पैलवानाकडून अशी अपेक्षा नव्हती. त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. तो पुढे म्हणाला, पैलवान अभिजित कटके याच्यावरही यापूर्वी असा डाव टाकण्यात आला होता. त्यात त्यालाही दुखापत झाली होती. यापूर्वी सेना केसरी स्पर्धेतही मला असाच अनुभव आला होता. मला दुखापत झाली असताना माझ्या पायाला क्रॅम्प आला. पण त्यानंतरही पंचांनी मॅच थांबवली नाही. त्यानंतर माझे वडील आखाड्यात आले. त्यांनी मध्यस्थी केली. महेंद्र गायकवाडने यापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर याला कानपटात मारण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर हिंद केसरी ट्रायलमध्येही त्याने इतर पैलवानांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या पैलवानाकडून अशा व्यवहाराची अपेक्षा नसते, असे पृथ्वीराज म्हणाला. स्पर्धेत नेमका काय झाला होता वाद? हिंद केसरी फायनलची कुस्ती सुरू झाल्यानंतर महेंद्र गायकवाडने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने पृथ्वीराज मोहोळवर आक्रमण करत 2 गुण मिळवले. पृथ्वीराज खाली होता, तेव्हा त्याचा उजवा हात पकडत महेंद्रने डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पृथ्वीचा हात उलटा झाल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. यामुळे काही वेळ कुस्ती थांबवण्यात आली. त्यानंतर पृथ्वी खेळण्यास तयार झाला. पण त्याचा हात अजिबातच हालत नव्हता. अखेरीस त्याने माघार घेतली आणि पंचांनी महेंद्र गायकवाडला विजयी घोषित केले. उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात तीनदा पराभव स्वीकारणाऱ्या महेंद्र गायकवाडने या स्पर्धेत फायनलपर्यंत येईपर्यंत अनेक मोठ्या पैलवानांना पराभवाची धूळ चारली. त्यात ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा मान मिळवणाऱ्या विजय चौधरीलाही त्याने अस्मान दाखवले. दरम्यान, या स्पर्धेत देशातील 28 राज्यांतील 850 मल्ला सहभागी झाले होते. या स्पर्धेत महिला व पुरुष या दोन्ही गटांतील महालढती पार पडल्या.
