नीट पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत:नांदेड कनेक्शनमध्ये असलेला ‘आलोक’ सीबीआयच्या रडारवर, तपास यंत्रणेचा मोठा खुलासा

0
db-temp-cover-marathi-2026-05-19t124007516_1779174683.jpg




देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे. दुसरीकडे, याच प्रकरणात रविवारी रात्री उशिरा लातूरच्या नामांकित ‘आरसीसी क्लासेस’चे (RCC) संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने पुण्यातून अटक केली असून, विशेष न्यायालयाने त्याला ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. कोण आहे नागपूरचा ‘आलोक’? नीट घोटाळ्याच्या तपासात नागपूरच्या ‘आलोक’ या गूढ नावाभोवती आता सीबीआयचा फास आवळला जात आहे. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेले त्याचे कारनामे थक्क करणारे आहेत. आलोकने देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास १ हजार विद्यार्थ्यांपर्यंत थेट किंवा दलालांमार्फत पेपर पोहोचवल्याचा संशय आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आलोकने अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुण्यात बोलावून घेतले होते. तेथेच गोपनीय ठिकाणी ठेवून त्यांना पेपर रटवून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आलोक हा नागपुरातील कोणत्या मोठ्या रॅकेटचा हिस्सा आहे की तो स्वतःच मुख्य सूत्रधार आहे, याबाबत सीबीआयने गोपनीयता पाळली असून त्याचा कसून शोध सुरू आहे. नांदेडच्या महिलेकडून आलोकचे नाव समोर सीबीआयच्या मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी यांनी नुकतीच नांदेडमध्ये धाड टाकली होती. नीट पेपरफुटी प्रकरणात नांदेडमधील हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली असता ‘आलोक’चे नाव समोर आले. नांदेडच्या विद्युतनगरमधील अश्विनी कदम नावाच्या महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना नीटचा पेपर खरेदी केला होता. यासाठी २५ हजार रुपये ऑनलाईन टोकन मनी म्हणून दिले गेले. त्यानंतर आलोकने या मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना १५ दिवस पुण्यात एका ठिकाणी थांबवून ठेवले आणि तिथेच तिला प्रत्यक्ष पेपर दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. कोचिंग क्लासेसचे संचालक फरार; प्राध्यापिका निलंबित दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढताच नांदेडमधील अनेक नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. सत्र संपल्याचे कारण पुढे करत अनेक क्लासेसने आपली कार्यालये घाईघाईने बंद केली आहेत, तर काही संशयित संचालक शहरातून फरार झाले आहेत. दरम्यान, याच प्रकरणात पुण्यातून अटक झालेल्या मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्र (Biology) विषयाच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. २००२ पासून कार्यरत असलेल्या मांढरे यांचे निलंबन १६ मेपासून लागू करण्यात आल्याचे परिपत्रक कॉलेजने काढले आहे. एनटीए प्रमुखांना संसदेचे समन्स; २१ मे रोजी होणार चर्चा नीट पेपरफुटीच्या वाढत्या वादामुळे आता केंद्र सरकार आणि परीक्षा घेणारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) अडचणीत आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संसदीय स्थायी समितीने एनटीएचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट समन्स बजावले आहे. येत्या २१ मे २०२६ रोजी संसदेत या विषयावर हाय-प्रोफाइल बैठक होणार असून एनटीए प्रमुखांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed