Shivraj Mothegaonkar CBI Custody; NEET Paper Leak Probe Update

0
nmcover-placecover-marathi_1779110020.jpg



NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकाऱ्याचाही सह

.

शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. अखेर सीबीआय कोर्टाने शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची कोठडी सुनावली आहे. शिवराज मोटेगावकर हे आरसीसी क्लासेसचे संचालक असून आता त्यांची सीबीआयमार्फत चौकशी केली जाणार आहे.

सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडले?

सुनावणीदरम्यान सीबीआय कोर्टात न्यायाधीश आणि तपास अधिकाऱ्यांमध्ये झालेला संवाद महत्त्वाचा ठरला. न्यायाधीशांनी तपास अधिकारी पवन कौशिक यांना थेट प्रश्न विचारला की, “मोटेगावकरकडेच प्रश्नपत्रिका आहेत, हे तुम्हाला कसं कळलं?” या प्रश्नावर उत्तर देताना तपास अधिकारी कौशिक म्हणाले की, “या प्रकरणातील संशयित निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी हा शिवराज मोटेगावकरच्या सतत संपर्कात होता., त्याद्वारे ही बाब समोर आली आहे. येथील कोचिंग सेंटरमार्फतच प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू होते.”

कागदपत्रे, इलेक्ट्रोनिक गॅझेट ताब्यात

याबाबत अधिकची माहिती अशी की, नीट पेपरफुटी प्रकरण केवळ राजयपूर्तेच मर्यादेत न राहता देशभरातील मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. यात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. यापूर्वी दोन प्राध्यापकांना सीबीआयने अटक केली होती. आता शिवराज मोटेगावकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. कारण मोटेगावकर यांचे राज्यभरात नीट परीक्षेसंदर्भात मोठे क्लासेस आहेत. गेल्याच आठवड्यात मोटेगावकर यांचे ज्या ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रोनिक गॅझेट देखील सीबीआयने ताब्यात घेतली होती.

पेपरफुटी करणाऱ्या टोळीतला सदस्य

शिवराज मोटेगावकरला आज सीबीआयने अटक केली असून त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर या संपूर्ण रॅकेटमध्ये मोटेगावकरांचा काय संबंध आहे हे समोर येणार आहे. तसेच जे प्रमुख आरोपी आहेत, लातूरचे पी.व्ही कुलकर्णी, पुण्यातल्या मनीषा मांढरे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या सर्वांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. मोटेगावकर हा नीटचे पेपर फोडणाऱ्या टोळीतला सक्रिय सदस्य असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

परीक्षेच्या 10 दिवस आधीच नीटची प्रश्नपत्रिका

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, देशभरात 3 मे रोजी नीटची परीक्षा होती. परीक्षेच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिल रोजीच शिवराज मोटेगावकरने नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती. चौकशीत मोटेगावकरच्या मोबाइलमध्येच नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. शिवराज मोटेगावकरने विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला तसेच विद्यार्थ्यांना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती, मात्र तपास यंत्रणेसमोर तो सध्या लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करत आहे. इतकेच नव्हे तर, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने परीक्षा संपल्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे सर्व तांत्रिक पुरावे देखील नष्ट केले असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हा डेटा तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्याचे समजते. त्यामुळेच मोटेगावकर गोत्यात आला आहे.

विवेक पाटीलचे नाव समोर

सीबीआयने शिवराज मोटेगावकरला बेड्या ठोकल्या. आता NTA चे अनेक अधिकारीही रडारवर असल्याचे समजते. एकपेक्षा अधिक अधिकारी पेपरफुटी प्रकरणात असल्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे. मोटेगावकरने विवेक पाटील याला नीटची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे समोर आले आहे. नीट परीक्षेतले प्रश्न पहिल्यांदा हस्ताक्षरातील कॉपीमध्ये उत्तरासह पुढे पाठवण्यात आले.

पीव्ही RCC मध्ये शिकवायचा

नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून अटक करण्यात आलेला निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा प्रश्नपत्रिका सेटर होता. तो लातूरमधील एका नामांकित कॉलेजमधून निवृत्त झाला होता. त्याने काही काळ शिवराज मोटेगावकरच्या RCC मध्ये अध्यापन केले होते. या दोघांमध्ये काही काळ खटके उडाले होते. मात्र, नंतर त्यांचे सूत जुळले. विशेष म्हणजे हे दोघेही नीट पेपरफुटीत संशयित आहेत.

अनेक क्लासचालक रडारवर

सीबीआयचा तपास जसा जसा सुरू आहे, तसे-तसे नीट पेपरफुटीतले बडे मासे समोर येत आहेत. विशेष म्हणजे मोटेगावकरच्या RCC प्रमाणे इतर बडे क्लासचालकही सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यांच्या सुद्धा नीटच्या पेपरफुटीमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. हे नेक्सस मोठे असून त्याची पाळेमुळे खणणे सुरू आहे. शिवराज मोटेगावकर अजून सीबीआयला हवे ते सहकार्य करत नाही. मात्र, त्याच्या मोबाइल डाटामधून अजून माहिती समोर येऊ शकते.

विद्यार्थ्यांसाठी आणली होती नवी योजना

नीटचा पेपर फुटल्याचे समोर आले. त्यानंतर NEET ची परीक्षा पुन्हा 3 मे रोजी होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्थातच NTA ने जाहीर केले. ही नवी तारीख जाहीर होताच RCC च्या शिवराज मोटेगावकरने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली होती. त्यानुसार तो RCC च्या टॉप टेस्ट सीरिज विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार होता. तसा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे वन शॉट व्हिडिो ही ऑनलाइन उपलब्ध करून देणार होता. विद्यार्थ्यांना 21 मे पासून हे सारे काही मोफत मिळणार होते. मात्र, त्याआधीच मोटेगावकर सीबीआयच्या रडारवर आला.

मोटेगावकरच्या क्लासेसला सुट्ट्या

नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला आज सीबीआयने बेड्या ठोकल्या. त्याला कोठडीही मिळाली आहे. तर दुसरीकडे या साऱ्या पार्श्वभूमीवर मोटेगावकरच्या RCC क्लासेसला दहा दिवस सुट्ट्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या दिल्याचे सांगितले जात आहे. या सुट्ट्या 20 मे पासून लागणार होत्या. मात्र, आज मोटेगावरकरला बेड्या ठोकल्यानंतर आजपासूनच विद्यार्थ्यांनाही सुट्ट्या देण्यात आल्याचे समजते. या साऱ्या घटनाक्रमाचे पडसाद क्लासेसवरही पडले आहेत. आता हे क्लास केव्हा सुरू होणार, हे सुद्धा पाहावे लागेल.

RCCच्या शिक्षकांना लाखोंचा पगार

मोटेगावकर RCC मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना लाखोंचा पगार देत होता. NEET आणि JEE च्या क्लासेससाठी तो हिंदी पट्ट्यातील शिक्षक भाडेतत्वावर आणायचा. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा येथील हे शिक्षक असत. त्यांचा महिन्याचा पगारच लाखोंच्या घरात असल्याचे समजते. तसेच काही शिक्षक तासिका पद्धतीवर येत. त्यांचे मानधन सुद्धा लाखो रुपयांच्या घरात होते. या शिक्षकांच्या बळावरच मोटेगावकरने लातूर आणि नांदेडनंतर थेट पुणे, पिंपर-चिंचवड, हडपसर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला येथे सुद्धा क्लासेस सुरू होते.

मनीषा मांढरेला 14 दिवसांची कोठडी

दरम्यान, बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. पुण्यातील बायोलॉजी लेक्चरर मनीषा गुरुनाथला दिल्लीतील CBI मुख्यालयात चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. एजन्सीचा दावा आहे की मांढरे NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचा भाग होती. मांढरेला माहीत होते की परीक्षेत कोणते प्रश्न येतील. तिने परीक्षेपूर्वी पुण्यात विशेष कोचिंग क्लास चालवला. तिथे तिने विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झूलॉजीचे प्रश्न लिहून दिले होते. तपासात हे देखील समोर आले आहे की, मांढरेने पुण्याहून अटक करण्यात आलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेच्या माध्यमातून NEET देणाऱ्या विद्यार्थ्यांना तिच्या कोचिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.

मोफत टेस्ट सीरिजचे आमिष

नीट पेपर लिकच्या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आणि धक्कादायक होती. सुरुवातीला विद्यार्थ्यांना आणि पालकांना टेलिग्राम व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मोफत टेस्ट सीरिज, दर्जेदार प्रश्नसंच आणि अभ्यास मार्गदर्शन देण्यात येत होते. या माध्यमातून पालकांचा विश्वास जिंकला जात होता. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना लक्ष्य करण्यात येत होते. कोचिंग क्लासेस, एज्युकेशनल कन्सल्टन्सी आणि वैयक्तिक संपर्कांच्या माध्यमातून त्यांच्याशी थेट व्यवहार सुरू होत होते. एका पालकाने दहा लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर स्वतःचे पैसे वसूल करण्यासाठी त्याच पालकाने तोच पेपर इतर दोन पालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांना विकल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात पालकांनीच इतर पालकांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोट्यवधींचे व्यवहार झाले

परीक्षेच्या दोन दिवस आधी लातूर, पुणे आणि इतर शहरांतील आलिशान हॉटेल्समध्ये या व्यवहारांच्या गुप्त बैठका होत असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. संबंधित पालकांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये बोलावले जाई. आत प्रवेश करताच त्यांचे मोबाईल जप्त केले जात होते. त्यानंतर त्यांना कथित लाईव्ह, प्रश्नपत्रिका आणि उत्तरे दाखवली जात होती. अर्धी रक्कम आगाऊ आणि उर्वरित रक्कम परीक्षा झाल्यानंतर देण्याच्या अटीवर कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अनेक परराज्यांतील ग्राहक या व्यवहारात सहभागी असल्याने तपास यंत्रणांनी विविध राज्यांमध्ये चौकशीचा वेग वाढवला आहे. सीबीआयच्या कारवाईची चाहूल लागताच अनेक श्रीमंत पालकांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडल्याची माहिती समोर आली आहे. काहींनी पैसे गेले तरी चालतील, पण चौकशी नको, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

संपूर्ण पेपर वेगवेगळ्या भागांमध्ये लीक

सीबीआयच्या तपासात पेपरफुटीची संपूर्ण साखळीही उघड झाली आहे. मनीषा वाघमारे नावाच्या महिलेने सुरुवातीला श्रीमंत विद्यार्थी आणि पालक शोधण्याचे काम केले. त्यानंतर धनंजय लोखंडे आणि इतर एजंटांच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका विविध शहरांमध्ये पोहोचवण्यात आली. नाशिकचा शुभम खैरनार, गुरुग्रामचा यश यादव आणि इतर आरोपींनी हा पेपर पुढे फिरवला. आरोपींनी संशय टाळण्यासाठी संपूर्ण पेपर एकाचवेळी न देता विषयानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये लीक केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. रसायनशास्त्राची जबाबदारी कुलकर्णीकडे, तर जीवशास्त्राच्या प्रश्नांची जबाबदारी इतर आरोपींकडे होती. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपयांची वसुली करण्यात आली.

डेटा पुन्हा मिळवणार

नीट पेपरफुटीच्या घोटाळ्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले आहेत. जयपूरमधून मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांना अटक करण्यात आली आहे. आपल्या मुलाला नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 10 ते 12 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. तपासात 500 ते 600 प्रश्न आधीच पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुरुग्राम आणि नाशिकमधील आरोपींनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करून मोबाईल, लॅपटॉप, कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सर्व साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

संपूर्ण साखळी तपासाच्या रडारवर

नीट पेपरफुटीच्या घोटाळ्यात काही नामांकित डॉक्टर आणि गर्भश्रीमंत पालकांचाही सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. वाशीममधील एका प्रसिद्ध डॉक्टरने चौकशीच्या भीतीने मोबाईल बंद करून शहर सोडल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडमध्येही अनेक पालक सध्या संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. तपास यंत्रणा आता या आर्थिक व्यवहारांचा माग काढत असून, काळ्या पैशांचा वापर झाला का याचाही शोध घेत आहेत. या प्रकरणात अजून मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सीबीआयकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी अटकसत्र होण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या यंत्रणांपासून ते एजंट, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण साखळी तपासाच्या रडारवर आली आहे. शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या या घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed