मंदिर देणगीतून शिकतात गरीब मुले; जीवन सुधारले:सिम्बायोसिसला शिकलेले देतात धडे
![]()
महामहेश्वर मंदिर… महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या कापडणे गावातील या मंदिरात भजन, कीर्तन व धार्मिक अनुष्ठानांपेक्षा पुस्तकांच्या पानांची सळसळ जास्त ऐकू येते. सिम्बायोसिसमधून उच्च शिक्षण घेतलेल्या एका ‘योगी’ महाराजांच्या मार्गदर्शनात येथे तरुण आपले भविष्य घडवत आहेत. मंदिरातील देणगी, महाराजांना मिळणारी दक्षिणा विद्यार्थ्यांचे शिक्षण, पुस्तकांवर खर्च होते. योगी सिद्धनाथ महाराज आणि या मंदिराची देखभाल करणाऱ्या ‘श्री शेषनाथ संस्थान’चे अध्यक्ष महेश पाटील यांनी मंदिर परिसरात ‘गुरुकुल’च्या रूपात एक अनोखी शैक्षणिक चळवळ उभी केली आहे. २०१३-१४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमात तीन स्टडी रूम आणि १० हजारांहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. दरवर्षी ५० गरजू विद्यार्थ्यांना येथे मोफत प्रवेश दिला जातो. योगी सिद्धनाथ महाराज मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडवतात. ७ तास बंद राहतो मोबाइल सकाळी ५:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत चालणाऱ्या या केंद्रात अभ्यासासोबतच मल्लखांब, कुस्ती, गोळाफेक यावरही भर दिला जातो. रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत मोबाइल बंद राहतात. ज्या तरुणांना नोकरी मिळाली आहे, ते सुट्ट्यांमध्ये नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. १५ हून अधिकांना नोकरी येथे शिकलेले १५ हून अधिक तरुण पोलिस आणि लष्करात भरती झाले आहेत. जेव्हा कुणाला नोकरी मिळते, तेव्हा मंदिरापासून संपूर्ण गावात त्याची मिरवणूक काढली जाते. हे चालवण्याचा खर्च भागवण्यासाठी मंदिर जवळच्या जमिनीवर फुलांची शेती करते. करिअरवर लक्ष केंद्रित येथे आम्ही कर्मकांड शिकवत नाही, तर करिअरवर लक्ष केंद्रित करतो. मी विद्यार्थ्यांना हे सांगतो की काय करण्यापेक्षा काय करू नये. समाजाच्या उपयोगी पडणे हाच उद्देश आहे. -योगी सिद्धनाथ महाराज, कापडणे
