विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, आचारसंहिता लागू:स्थानिक यंत्रणेत लगबग; 25 मे रोजी अधिसूचना, 18 जूनला मतदान, 22 ला निकाल
![]()
अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना आता कोणत्याही नव्या विकासकामांची घोषणा करता येणार नाही. तसेच, त्यांना सरकारी वाहनांचा वापर टाळावा लागणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेची लगबग सुरू झाली आहे. या निवडणुकीत एकूण ४७३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये अचलपूर नगरपालिकेचे सर्वाधिक ४५ मतदार आहेत. जिल्ह्यातील चार नगरपंचायतींमधील प्रत्येकी १९ असे एकूण ७६ नवे नगरसेवकही या मतदार यादीत समाविष्ट आहेत. मागील निवडणुकीत दोन नगरपंचायतींमध्ये निवडणूक न झाल्याने तेथील नगरसेवकांना मतदानाचा हक्क मिळाला नव्हता. सध्या जिल्हा परिषदेचे ५९ सदस्य आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे १४ सभापती अशा एकूण ७३ जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक व्हायची असतानाही विधान परिषदेची निवडणूक घेतली जात आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आवश्यक आहे, त्यामुळे ही निवडणूक घेतली जात आहे. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने या निवडणुकीची तयारी मनपा-नगरपालिकांच्या निवडणुकीवेळीच सुरू केली होती. सध्या त्यांच्याकडे बहुमत असले तरी, उमेदवारी निश्चित करण्यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. त्यामुळे नेमके चित्र १ जूनपूर्वी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतदारसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने अद्याप उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा सुरू केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबद्दलही सर्वांना उत्सुकता लागली आहे.
