औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी बंद:प्रशासनाचे नागरिकांना आवाहन; घाबरू नका, औषधांचा साठा करा
![]()
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २० मे २०२६ रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे विभागातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा आणि आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करून ठेवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे. पुणे विभागाचे सह आयुक्त (औषधे) गि. दि. हुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंदमुळे शहर आणि जिल्ह्यातील बहुतेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि काही निवडक औषध दुकाने या काळात सुरू राहतील. यामध्ये प्रामुख्याने मेडप्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फॉरएव्हर यांसारख्या साखळी फार्मसी, रुग्णालयांना संलग्न असलेली औषध दुकाने तसेच जेनेरिक औषध दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. औषध विक्रेत्यांना ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ अंतर्गत परवाने देण्यात आले असून, रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे हुकरे यांनी सांगितले. औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत औषधांची गरज भासल्यास प्रशासनाने खालील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत: १. रु. वि. पोंगळे (सहाय्यक आयुक्त): ९७३००८५५८८ २. स. कृ. तितर-दातीर (सहाय्यक आयुक्त): ८६०५०००४६० ३. आ. अ. रासकर (सहाय्यक आयुक्त): ८६५२५८३५२५ ४. सं. मा. राठोड (सहाय्यक आयुक्त): ९९२३३०४६५०
