नागपुरात 'आपली बस'ला टिप्परची धडक:पंचशील चौकात अपघात, महिला वाहक गंभीर, ४ प्रवासी सुखरूप

0
39a70f26-0ed3-4d78-b2e4-bd210fb2edb7_1779089718247.jpg




खापरी नाका डेपोतून ‘आपली बस’ टर्मिनलकडे जाणाऱ्या ईकेए कंपनीच्या इलेक्ट्रिक बसला पंचशील चौकात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका अज्ञात टिप्परने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील महिला वाहक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चालकही जखमी झाला आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी बसमध्ये उपस्थित असलेले चारही प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खापरी नाका डेपो क्रमांक १ ची एमएच ४०, डीसी २६०२ क्रमाकांची इलेक्ट्रिक बस सकाळी तिच्या नियमित वेळापत्रकानुसार टर्मिनलकडे जात होती. बस पंचशील चौकात आली असता, भरधाव येणाऱ्या एका अज्ञात टिप्परने बसच्या उजव्या बाजूला समोरील भागाला जोरदार धडक दिली आणि चालक टिप्परसह घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेमुळे बसच्या समोरील भागाचे, उजव्या बाजूच्या बॉडीचे आणि समोरील काचेचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात बसमधील महिला वाहक सपना मोटघारे यांच्या गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर बस चालक तन्वीर अहमद हेदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४ प्रवासी होते, मात्र त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी बस चालक तन्वीर अहमद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस पसार झालेल्या अज्ञात टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *