कांदा उत्पादकांना ₹2000 दर द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन:सासवडमध्ये काँग्रेसचा एल्गार; केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका

0
7be5189c-1169-46b7-9405-5e4d21deea12_1779121459402.jpg




केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत, कांदा उत्पादकांना किमान २००० रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे. पुरंदर तालुका काँग्रेस आणि पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने सासवड येथील ऐतिहासिक जयप्रकाश चौकात भव्य निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कांदा उत्पादकांच्या समस्या, ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या या मुद्द्यांवरून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान बोलताना गोपाळ तिवारी म्हणाले की, केंद्र सरकारच्या लहरी आणि आडमुठ्या निर्यातबंदी धोरणामुळे शेतकऱ्यांनी आखाती देशांतील आपली हक्काची बाजारपेठ गमावली आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे. शेतकरी हितासाठी स्थापन झालेल्या ‘नाफेड’ संस्थेने केवळ नफा-तोट्याचा विचार करणाऱ्या व्यापाऱ्याप्रमाणे वागू नये, असेही त्यांनी नमूद केले. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली हमीभावाची आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच ‘नीट’ परीक्षेतील गोंधळावरही तिवारी यांनी प्रहार केला. एकीकडे शेतकरी संकटात असताना, दुसरीकडे केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी क्रूर थट्टा करत आहे. शिक्षणाचा बाजार मांडला असून, नीट परीक्षा पारदर्शकपणे राबवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेची भावना पसरली असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, अशी टीका त्यांनी केली. या आंदोलनात पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, पुरंदर तालुका काँग्रेस अध्यक्ष साहेबराव फडतरे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. सचिन विमल आणि जिल्हा कार्याध्यक्ष लहुआण्णा निंवगुणे यांनीही केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी रामचंद्र दुर्गाडे, दत्ताशेठ झुरुंगे, गणेश ढोणे, प्रदीप पोमण, माऊली भोराडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे, युवक अध्यक्ष उमेश पवार, बापू मोकाशी, बाळासाहेब कड, संदीप भोसले, ऋषीकेश जगताप, अतिश जगताप, राजन पवार यांच्यासह भोर-पुरंदर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *