पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांना अटक:गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असताना खडक पोलिसांची कारवाई

0
15954ac0-ba31-45a4-b5cd-f539aabf1984_1779115664217.jpg




पुणे विमानतळावर गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिला आणि एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांनी अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) ऋषिकेश रावले यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलगा हे बांगलादेशी नागरिक असून ते पुणे विमानतळावरून आसाममधील गुवाहाटी येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक महेंद्र कांबळे आणि त्यांच्या पथकाने पुणे विमानतळावर सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनी आपली ओळख उघड केली. ताब्यात घेतलेल्यांमध्ये शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (वय २८) आणि एक १६ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे तिघेही बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील मिजेरा गावचे रहिवासी आहेत. प्राथमिक तपासात त्यांनी सोलापूरहून आल्याचे आणि पुण्यामार्गे गुवाहाटीला जाण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगितले. या तिघांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त ऋषिकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस आणि सीआयएसएफच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *