अभिनेत्री अमृता सुभाष यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार:बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय दरवर्षी देतात हा पुरस्कार
![]()
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (थत्ते) यांनी ही माहिती दिली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता पुणे येथील नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. मागील वर्षीचे पुरस्कारार्थी अभिनेते प्रसाद ओक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते अमृता सुभाष यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री सुहास जोशी असतील. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर समीरा गुजर जोशी या अमृता सुभाष यांची प्रकट मुलाखत घेतील. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी आघाडीच्या कलाकारांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. निळू फुले यांच्यासारख्या महान कलाकाराला आदरांजली वाहणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख २१ हजार रुपये, गांधी टोपी, उपरणे आणि मानपत्र असे आहे. यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, सुमीत राघवन आणि प्रसाद ओक यांना या कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर यांनी सांगितले की, “निळू फुले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांप्रती आदर व्यक्त करणे, त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि नव्या पिढीला त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने आम्ही गेली तीन वर्षे हा पुरस्कार उपक्रम राबवत आहोत. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, दरवर्षी मागील वर्षीच्या सन्मानार्थीने यावर्षीच्या सन्मानार्थीला सन्मानित करावे, ही परंपरा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने यंदा प्रसाद ओक आणि अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते अमृता सुभाष यांना गौरवण्यात येईल.”
