परिवहन मंत्री मराठी सक्तीवर कठोर:म्हणाले – शाहरूख, सलमान, अंबानी, अदानींनी परवाना घेतला नाही, रिक्षा – टॅक्सी चालकांनी घेतलाय

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-08t12_1779090288.png




राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीचे समर्थन केले आहे. शाहरूख किंवा सलमान खानने आमच्याकडून चालक परवाना घेतला नाही. अंबानी – अदानींनीही ट्रान्सपोर्टचा परवाना घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर येथील भाषा शिकावीच लागेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागण्याचेही संकेत दिलेत. प्रताप सरनाईक यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सरकारची उपरोक्त भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती केल्याने त्यांच्या रोजगारावर गदा येणार नाही. मराठी सक्तीचा नियम काही नवा नाही. तो 1989 चा आहे. आरटीओ कार्यालयात बोगस परवाने व बोगस कागदपत्रे देण्याच्या तक्रारी आमदारांनी माझ्याकडे केल्या होत्या. त्यानुसार मी परिवहन मंत्री म्हणून या जुन्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. हा मूळ संवादाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या अनेक प्रवाशांना हिंदी समजत नाही किंवा त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे चालक व प्रवाशांत खटके उडतात. सरकारने मीरा – भाईंदरमध्ये 3500 चालकांचे सर्व्हेक्षण केले. तेव्हा तब्बल 565 चालकांना मराठी येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. आता चालकांनी युनियनच्या माध्यमातून वाढीव मुदत मागितली आहे. त्यानुसार, त्यांना 15 ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे. सरकार केवळ नियम करून थांबले नाही, तर मुंबई मराटी साहित्य संघाच्या मदतीने चालकांसाठी एक दैनंदिन संवादाची पुस्तिकाही तयार केली आहे. एवढेच नाही तर मराठी भाषा शिकण्यासाठी अर्ध्या तासाच्या तासासाठी चालकांना 100 रुपये मानधनही दिले जात आहे. चालकांना कामचलाऊ मराठी यावी हाच आमचा उद्देश आहे. 15 ऑगस्टनंतर प्रथम दंड, नंतर कारवाई प्रताप सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रात काम करायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे. यात कोणतीही दुटप्पी भूमिका नाही. तुम्ही लायसन्स व परवाना घेतला तेव्हाच प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्यात आधार कार्ड, जन्माचा दाखला, विम्यासह मराठीचे ज्ञान या अटींचा समावेश होता. तेव्हा तुम्ही ते मान्य केले आहे. मग आता याला सक्ती कशी म्हणता येईल? 15 ऑगस्टनंतर सरकार लगेच लायसन्स जप्त करणार नाही. पहिल्या चुकीसाठी 500 रुपये दंड असेल. पण आम्ही फार वेळ वाट पाहणार नाही. काही चालक इथे 20-25 वर्षांपासून राहत आहेत. मुंबईने देशभरातील लोकांना सामावून घेतले आहे. हा महाराष्ट्राचा मोठेपणा आहे. पण आदर दोन्ही बाजूंनी असला पाहिजे. आम्ही कुणाला घरात मराठी बोलण्यास सांगत नाही. फक्त मागे बसलेल्या प्रवाशांशी मराठीत बोला एवढीच अपेक्षा आहे. सरकार गरिबांना लक्ष्य करत नाही प्रताप सरनाईक यांनी यावेळी सरकार या प्रकरणी केवळ गरीब कामगारांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही फेटाळून लावला. ते म्हणाले, शाहरूख, सलमान, अंबानी किंवा अदानी यांनी सरकारकडून परवाने घेतले नाहीत. त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही. पण दुकानदारांनी परवाने घेतलेत. त्यामुळे महापालिकेने दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्यामुळे वरच्या बाजूला इंग्रजीत मोठे नाव लिहा, पण खाली मराठीतही ते नाव असले पाहिजे. हाच नियम चालकांना लागू होतो. इंधन दरवाढीमुळे तिकीट दरवाढ होणार प्रताप सरनाईक यांनी यावेळी इंधन दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढण्याचेही संकेत दिले. ते म्हणाले, एसटीला 10 लाख 87 हजार लिटर डिझेल लागले. इंडियन ऑईलकडून डिझेलचा पुरवठा होतो. मागील आठवड्यात 3 रुपये दरवाढ झाली. त्याचा 33 लाख 70 हजार रुपयांचा भार आमच्या तिजोरीवर पडला. यामुळे एसटीला वार्षिक 124 कोटींचा तोटा होत आहे. जागतिक युद्धाचा भडका उडाला तर त्याचा आणखी परिणाम होईल. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. विशेष सवलत देण्याचा निर्णय झाला तर एसटी दरवाढ करणार नाही. पण उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत आम्ही मुख्यमंत्र्यांपुढे आम्ही आमची भूमिका मांडू. त्यांना पत्र देऊ. मे पर्यंत आम्ही वाट पाहू. त्यानंतर पुढील 10 – 12 दिवस केंद्र व राज्य सरकारने पूर्तता केली तर दरवाढ होणार नाही. पण पूर्तता न झाल्यास दरवाढ करावी लागेल. ऑईल कंपन्यांनी जुन्या किंमतीत तेल दिले तरही दरवाढ होणार नाही. पण इंधनवाढ झाली तर दरवाढ करावीच लागेल. यात पूर्वीपासून चालत आलेल्या सवलती कायम राहतील, असे सरनाईक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *