महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल; नांदेडसह १६ जागांसाठी १८ जूनला मतदान
नवी दिल्ली/मुंबई (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये नांदेड, परभणी-हिंगोली, उस्मानाबाद-लातूर-बीड, औरंगाबाद-जालना, पुणे, ठाणे, नाशिक आदी मतदारसंघांचा समावेश आहे. आयोगाने सोमवारी याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले.
या मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आवश्यक निकष पूर्ण न झाल्याने निवडणुका प्रलंबित होत्या. मात्र आता संबंधित मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची आवश्यक अट पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आयोगाला दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून असेल. २ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतमोजणी २२ जून रोजी होणार असून २५ जूनपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या निवडणुकांमुळे राज्यातील अनेक राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. विशेषतः नांदेड, परभणी-हिंगोली आणि उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे
Post Views: 3
