बदलापूर अत्याचार प्रकरण:पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली; 10 वी पर्यंतचे शुल्क मंजूर
![]()
बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली आहे. विशेष म्हणजे दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्कालाही शासनाने मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याची केवळ घोषणाच केली होती. तसेच शासनाकडून या मुलींची फी भरली जात नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी सोशल मीडियाच्या एका पोस्टच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर अखेर सरकारने पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मुलींच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये या उद्देशाने शासन आरटीई अंतर्गत थेट शाळांना निधी देणार असून, याअंतर्गत निर्भया क्र. 1 चे पहिली ते दहावीपर्यंतचे आणि निर्भया क्र. 2 चे सीनिअर केजी ते दहावीपर्यंतचे सर्व शुल्क आता शासनाकडून अदा केले जाणार आहे. हे शैक्षणिक शुल्क शाळांना वेळेत मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. बदलापूरच्या घटनेविषयी थोडक्यात… बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. 12 ऑगस्ट 2024 रोजी एका मुलीसोबत, तर 13 ऑगस्टला दुसऱ्या चिमुरडीला लघुशंकेच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर हे दुष्कृत्य करण्यात आले. दोन्ही मुलींनी शाळेत जाण्यास तीव्र नकार दिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली, ज्यातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 16 ऑगस्ट 2024 रोजी पीडितांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली, मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी तब्बल 12 तासांचा विलंब केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि संतप्त जनसमुदायाने बदलापूर रेल्वे स्थानक रोखून धरत आरोपीला फाशी देण्याची मागणी करत उग्र आंदोलन केले. जनआक्रोशानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. मात्र, या प्रकरणाला 23 सप्टेंबर 2024 रोजी एक वेगळे वळण मिळाले, जेव्हा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्याला तळोजा कारागृहातून पुढील चौकशी व रिमांडसाठी पोलिस वाहनातून घेऊन जात असताना ही घटना घडली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे आणि त्यानंतर झालेल्या आरोपीच्या एन्काऊंटरमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
