आर्थिक अडवणुकीवर शिक्षकांच्या संघटनांनी वेधले लक्ष:शहरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विशेष बैठकीत जाणून घेतल्या सर्वांच्या अडचणी‎

0
253_17789265936a084401e7dbe_shikshak.jpg




प्रतिनिधी | अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण विभागातील फायली मंजुरीसाठी केली जाणारी अडवणूक, आर्थिक व्यवहारांसाठी होणारा छळ आणि महिला कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा या गंभीर तक्रारींवरून अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनांनी थेट नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित विशेष बैठकीत हा शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. संबंधित कार्यालयीन अधीक्षकाच्या निलंबनाची मागणी लावून धरली. बैठकीला दांडी मारणाऱ्या या अधीक्षकाला आमदार दराडे यांनी तात्काळ बोलावून घेत सर्वांसमोर चांगलेच धारेवर धरले. ​बैठकीला जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर यांच्यासह माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, मुख्याध्यापक संघाचे सचिव संभाजी पवार आदी उपस्थित होते. ​बैठकीत शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले. माध्यमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षकांकडून प्रत्येक कामासाठी कशी अडवणूक केली जाते, याचे पुरावेच संघटनांनी आमदारांसमोर मांडले. काही महिला कर्मचाऱ्यांनीही आपल्याला होणाऱ्या त्रासाची हकीकत बैठकीत उघड केली. “फायली मंजूर करण्यासाठी आर्थिक व्यवहार करावे लागतात, अन्यथा प्रस्ताव वर्षानुवर्षे दाबून ठेवले जातात,” असा खळबळजनक आरोप प्रतिनिधींनी केला. हा प्रकार ऐकून आमदार दराडे संतप्त झाले. त्यांनी अनुपस्थित अधीक्षकाला तात्काळ संपर्क साधून बैठकीत हजर होण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *