पुणे जीसीसी हब बनणार:पुढील 4-5 वर्षांत शहर अत्याधुनिक ओळख निर्माण करेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास
![]()
पुणे शहराची जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) म्हणून ओळख निर्माण होत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारल्या जात आहेत. पुढील चार ते पाच वर्षांत पुणे एक अत्याधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते महंमदवाडी येथे समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुंढवा येथील महात्मा फुले चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजनही करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, भीमराव तापकीर आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात आलेली समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामाचा दर दोन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे २५ टक्के गुंतवणूक पुण्यात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढत्या गुंतवणुकीसाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो मार्गांचे जाळे, शहराला जोडणारे रस्ते आणि भुयारी मार्ग विकसित केले जात आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही वर्षांत सुरू केलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन पुढील चार वर्षांत होणार आहे. पुण्याची एक आधुनिक, सक्षम आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका समन्वयाने काम करत आहे, असे फडणवीस यांनी अधोरेखित केले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या धर्तीवर ‘विकसित पुणे’ या संकल्पनेनुसार शहराला सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी काम सुरू आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्या कार्यान्वित झाल्यामुळे ३ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होणार आहे. खराडी ते महात्मा फुले चौकदरम्यान मेट्रोसह दुमजली पुलामुळे खराडीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
