सरकार-देवाने काम केले असते तर देश बदलला असता:व्यक्ती-समाज जागृत झाल्यास देश बदलता येईल, नितीन गडकरींचे विधान

0
b1ceec8b-075b-4c7b-8b5d-1c08b918aa34_1779026165900.jpg




केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात रोखठोक भूमिका मांडली. “सरकार आणि देवाने काम केले असते तर देश कधीचा बदलला असता,” असे ते म्हणाले. लोकांचा सरकार आणि देव या दोघांवर खूप विश्वास असतो, पण या दोघांनाही बाजूला ठेवून व्यक्ती आणि समाजाने जागृत होऊन काम केल्यास देशाला बदलता येईल, असे आवाहन त्यांनी केले. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय’ या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. गडकरींनी लोकसहभागातून कामे करण्यावर आणि लोकजागृतीवर भर दिला. २५ वर्षांच्या अनुभवातून लोकसहभागातून मोठी कामे उभी राहतात, असे त्यांनी सांगितले. एका शेतकरी विधवेचे दुःख पाहूनच आपण शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. राजकारण म्हणजे केवळ ‘पॉवर पॉलिटिक्स’ नसून ते समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण असले पाहिजे, असे मत गडकरींनी व्यक्त केले. अशा पद्धतीने काम करणाऱ्या नेत्याला पोस्टर किंवा बॅनर लावण्याची गरज नसते. आपण १५ वर्षांपासून खासदार असून, पोस्टर-बॅनर लावणे बंद केले आहे. “अजेंडा माझा चालेल, तुमचा नाही,” हे लोकांना सांगितले असता लोक ते समजून घेतात, असा अनुभव त्यांनी सांगितला. विदर्भातील पाण्याची समस्या ही सर्वात मोठी असून, त्यावर मात करण्यासाठी सिंचन सुविधा वाढवणे आवश्यक आहे. एका बाजूला पूर येत असतानाही गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते, ही परिस्थिती बदलण्यासाठी पूर्ती सिंचन संस्थेची स्थापना करण्यात आली, असे गडकरींनी स्पष्ट केले. या कार्यक्रमादरम्यान गोसेखुर्द प्रकल्पग्रस्ताने “पण गरिबांचे काय?” म्हणत घोषणाबाजी केल्याने काही काळ खळबळ उडाली. हातात पोस्टर घेतलेल्या या व्यक्तीने “तुम्ही सगळं सांगता, पण गरिबांचे काय?” असे प्रश्न विचारले. यामुळे क्षणभर गोंधळ निर्माण झाला. गडकरींनी त्याला नंतर भेटून समस्या सांगण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सभागृहाबाहेर नेले. पेट्रोल-डिझेल भाववाढ आणि शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या भावना या प्रकल्पग्रस्ताने मांडण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed