नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी:पाण्यावर चर्चा करता, मग आमचे प्रश्न कधी सोडवणार? गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा सवाल

0
db-temp-cover-marathi-2026-05-17t230419529_1779039310.jpg




केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंवाद परिषदे’त नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असतानाच, प्रकल्पग्रस्तांनी अचानक जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. अखेर सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी तातडीने धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, जलसंवाद परिषदेच्या व्यासपीठावरून नितीन गडकरी पाणी आणि सिंचन व्यवस्थेवर मार्गदर्शन करत होते. त्याच वेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी उभे राहून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. “तुम्ही व्यासपीठावरून पाण्याच्या विषयांवर मोठ्या चर्चा करता, मग अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आम्हा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कधी सोडवणार?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला. गडकरींचा प्रतिसाद; ‘हे योग्य व्यासपीठ नाही, नंतर भेटा’ भर कार्यक्रमात अचानक सुरू झालेली घोषणाबाजी पाहून नितीन गडकरी यांनी भाषणातूनच आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. आंदोलकांच्या मागण्या ऐकून त्यांना थेट व्यासपीठावरून प्रतिसाद देत गडकरी म्हणाले, “तुमच्या प्रश्नांवर आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही. तुम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर मला नंतर स्वतंत्रपणे येऊन भेटा, आपण नक्की चर्चा करू.” पोलिसांची मध्यस्थी अन्‌ आंदोलकांना कार्यक्रमस्थळाबाहेर काढले नितीन गडकरी यांनी समजूत काढल्यानंतर आणि आवाहन केल्यानंतरही आंदोलक शांत झाले नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना कार्यक्रमस्थळीच ताब्यात घेतले आणि त्यांना सभागृहाबाहेर नेले. या गोंधळामुळे काही मिनिटे कार्यक्रमात व्यत्यय आला होता, मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले उर्वरित भाषण पूर्ण केले. हे ही वाचा… एकनाथ शिंदेंचा अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा:पुण्यातील जमिनीच्या TDR प्रकरणाला तात्पुरती स्थगिती, नेमके प्रकरण काय? मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआर (TDR) प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अंतिम निर्णय होईपर्यंत पुणे महानगरपालिकेने केलेल्या संबंधित टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे गेल्या २६ वर्षांपासून कायदेशीर लढा देणाऱ्या चव्हाण कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed