शहीद सुखदेव थापर यांना जयंतीनिमित्त विचारांनी अभिवादन:नवजागरण समितीने अमरावतीत आयोजित केला कार्यक्रम
![]()
अमरावती येथे नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या स्थानिक शाखेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारी शहीद सुखदेव थापर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. महावीर नगर येथील समिती कार्यालयात क्रांतिकारी विचारांच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शहीद सुखदेव थापर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘साम्राज्यवाद मुर्दाबाद’, ‘शहीद सुखदेव थापर अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. वक्त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शहीद सुखदेव थापर, भगतसिंग आणि राजगुरू यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे, तर शोषणमुक्त, समताधिष्ठित आणि समाजवादी भारताच्या निर्मितीसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि वंचित जनतेच्या मुक्तीचा होता. आजच्या काळात वाढती आर्थिक विषमता, बेरोजगारी, खासगीकरण आणि सामाजिक अन्याय यांच्या विरोधात लढण्यासाठी क्रांतिकारकांच्या समाजवादी विचारांची नितांत आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. वक्त्यांनी पुढे सांगितले की, ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधातील लढा केवळ सत्तांतराचा संघर्ष नव्हता, तर तो शोषणाविरुद्धचा व्यापक जनसंघर्ष होता. शहीद सुखदेव थापर यांनी युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता आणि क्रांतिकारी परिवर्तनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांमधून समाजात बंधुता, न्याय आणि समानतेची प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले. समितीच्यावतीने क्रांतिकारकांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. युवकांनी जातीवाद, अंधश्रद्धा, अन्याय आणि शोषणाविरोधात संघटित होऊन प्रगतिशील व समाजवादी परिवर्तनासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी गणेश मुंधरे, रुपेश वानखडे, प्रियंका मुंधरे, निलू दास, किशोर पेंढारकर, दीपाली ढेवले, धनश्री गांजरे, ओम चेडे, स्वरा साबे, वीरा हनवते, मसिरा शेरखान, भावेश चाफले, कृष्णाई ठाकरे, अर्णवी सांगले, हिमांशू चरपे, गौरी हिरोळे, मानवी पत्रे, निकिता निमजे, पूर्वी चिंचमलातपुरे, नेहा घावट, ईश्वरी डगवार, मानवी माहुरे, सबुरी जावरकर, सनी घावट, प्रांजली राऊत, कौतुक चोरे, ईश्वरी हटवार, सर्वज्ञ पाचकवडे, आराध्या मंडाले आदी उपस्थित होते.
