महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनावे:दर्यापूर येथील हिंदू जागरण सभेत काजल हिंदुस्थानी यांचे आवाहन
![]()
दर्यापूर येथे आयोजित हिंदू जागरण सभेत प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी महिलांना आत्मसंरक्षणासाठी ‘दुर्गा’ बनण्याचे आवाहन केले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यास सांगितले. तसेच, स्वतःला आणि मुलांना भ्रमणध्वनीच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. अनोळखी व्यक्तींना सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नये, असे आवाहनही काजल हिंदुस्थानी यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नावाने स्थापन झालेल्या गोपाल अरबट मित्र परिवाराच्या वतीने बसस्थानकासमोरील कन्या शाळेत या हिंदू जागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. काजल हिंदुस्थानी यांनी देशात आणि महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’च्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. यावर शासन स्तरावर कायद्याने कारवाई होत असली तरी, नागरिकांनी सावध राहून अशा घटना टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील डिके, सहसंपर्क प्रमुख गजानन वाकोडे, रवींद्र गणोरकर, अरुणा इंगोले, जयश्री खातखीडे, वंदना दारवेकर, मदत कक्षाच्या सोनाली देशमुख, तालुकाप्रमुख छाया निचळ, मीनाक्षी कपले, डॉ. भावना भुतडा, भारतीय जनता पार्टीच्या मेघा भारती, प्रगती पोटे, वर्षा उफाळे, विद्याताई अरबट, अपर्णा मालठाने, प्रा. प्रणिता बिजवे, वृंदा मुक्तेवार, भाग्यश्री सगणे, प्रीती उमाळे, डॉ. दिनेश म्हाला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्विनी अरबट यांनी केले, तर संचालन मनोज गव्हाणे आणि प्रा. मंजुषा यांनी केले. महेंद्र भांडे, तुषार चौधरी, राहुल भुंबर, हेमंत उमाळे, सागर गेठे, नीरज नागे, मुन्ना इसोकार, अतुल सगणे, विनय गावंडे, युवा सेना तालुका प्रमुख भूषण नागे, अमित ठाकरे, योगेश गायकवाड, सतीश नाग, सूरज पाचखडे, संदीप गुल्हाने, प्रवीण बायस्कर, बाप्पू साबळे, सौरभ वायझडे, नगरसेविका रमा सावळे, स्वप्निल गावंडे, नगरसेवक रोशन कट्यारमल, गणेश धुराटे, कपिल पोटे आदींनीही या सभेला उपस्थिती लावली. अमरावतीत ७ जून रोजी हिंदू जागरण सभेचे आयोजन सध्या सर्वत्र हिंदू जनजागरण सभांचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेत अमरावतीच्या दसरा मैदानावर आगामी ७ जून रोजी ऐतिहासिक हिंदू जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसार प्रचारासंदर्भात हिंदुत्वनिष्ठांची पहिली बैठक भक्तिधाम मंदिर, साईनगर येथे पार पडली.
