रस्ता अडवून लुटणाऱ्या दोघांना पकडले:सात मोबाईल, दुचाकी वाहनासह २.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त, नांदेडचे चार गुन्हे उजेडात
वसमत तालुक्यात दोन ठिकाणी रस्ता अडवून चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीपैकी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ता. १५ रात्री अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी वाहन, खंजर, सात मोबाईल असा २.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी इतर चौघांचा शोध सुरु आहे. वसमत तालुक्यातील भेंडेगाव व दारेफळ मार्गावर ता. ११ मे रोजी दुचाकी अडवून चोरट्यांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम व एक दुचाकी वाहन पळविले होते.या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी गु्ुन्हे शाखेचे पथक स्थापन केले होते. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार सुभाष घुगे, कोंडीबा मगरे, सतीष जाधव, विक्रम कुंदनानी, आझम प्यारेवाले, विशाल खंडागळे, किशोर सावंत, दत्ता नागरे, मारोती काकडे यांच्या पथकाने मागील दोन दिवसांपासून या भागात माहिती घेण्यास सुरवात केली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील टोळी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी किसन सुर्यवंशी (रा. नांदेड), आदित्य उर्फ आद्या जाध‘ (रा. नांदेड) यांना ताब्यात घेतले. त्यांनी इतर चौघांसोबत मिळून लुटल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७ मोबाईल, खंजर, दुचाकी वाहन असा २.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्यांनी नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात इतर चौघांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
