डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-15t08_1778815097.png




मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आजारांकडे भीती किंवा लाज म्हणून न पाहता, तोही इतर शारीरिक आजारांप्रमाणेच सामान्य विषय आहे, ही भावना समाजात रुजवण्यासाठी मोठे कार्य केले. सामान्य माणसालाही सहज समजेल अशा भाषेत त्यांनी मानसिक आरोग्याविषयी लेखन आणि मार्गदर्शन केले. मनोविकारांबद्दलची भीती कमी करण्यासाठी त्यांनी व्याख्याने, पुस्तके, नाटके आणि समुपदेशनाच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांच्या कामामुळे हजारो लोकांना मानसिक आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची दिशा मिळाली. वैद्यकीय क्षेत्रासोबतच साहित्य आणि नाट्यविश्वातही त्यांनी वेगळी छाप सोडली. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘आम्ही जगतो बेफाम’ यांसारखी नाटकेही त्यांनी लिहिली. ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला होता. तर ‘गेट वेल सून’ या नाटकाच्या कथासंकल्पनेलाही मोठी दाद मिळाली होती. ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘एका सायकिअ‍ॅट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘मनोगती’, ‘मुक्तिपत्रे’, ‘स्वभाव-विभाव’ आणि ‘हेही दिवस जातील!’ यांसारख्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी मानवी मनाचा वेध घेतला. डॉ. नाडकर्णी यांनी 1980 मध्ये एमबीबीएस आणि 1984 मध्ये मनोविकारशास्त्रात एमडी पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच मनोविकारांविषयी समाजात जागृती निर्माण करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली होती. त्यातूनच 23 मार्च 1990 रोजी ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ अर्थात ‘आयपीएच’ संस्थेची स्थापना झाली. ही संस्था केवळ मानसिक आजारांवर उपचार करणारी न राहता, व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन, कुटुंबीयांना मार्गदर्शन आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणारे केंद्र बनली. साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद या माध्यमांचाही त्यांनी उपचार प्रक्रियेत प्रभावी वापर केला. ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ म्हणून ओळख ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ म्हणून ओळख निर्माण करणारे डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ डॉक्टर नव्हते, तर संवेदनशील विचारवंत आणि समाजप्रबोधन करणारे व्यक्तिमत्त्व होते. मानसिक आरोग्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा दीर्घकाळ कायम राहणार आहे. मान्यवरांनी व्यक्त केल्या संवेदना मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून कार्य करणारा दीपस्तंभ निमाला – मुख्यमंत्री मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. नाडकर्णी यांनी मानसोपचाराला केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले नाही. त्यांनी त्याला सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासाची जोड दिली. यातून त्यांनी मानसोपचाराबाबतचा समाजातला पूर्वग्रह दूर करण्यासाठी अनेकविध उपक्रम राबविले. सामाजिक प्रश्नांवर ते संवेदनशीलपणे संशोधन अभ्यास करत उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील राहिले. या सगळ्यात ते व्याख्यानांमधून आणि विविध व्यासपीठांवरून सातत्याने बोलत राहिले. त्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. लालित्यपूर्ण लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. यामुळे मराठी साहित्यातही त्यांच्या वैविध्यपूर्ण पुस्तक आणि कविता संग्रहाची भर घातली गेली. डॉ नाडकर्णी आयपीएच, मुक्तांगण व अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते सक्रियपणे कार्यरत राहिले. त्यांच्या निधनामुळे मार्गदर्शक या सर्व क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे. त्यांचे निधन वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्यिक दृष्ट्या मोठी हानी आहे. डॉ नाडकर्णी यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. समर्पित भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व गमावले – सुनेत्रा पवार प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रात संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केवळ एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक प्रख्यात लेखक, कवी, नाटककार आणि विचारवंत म्हणून हजारो तरुणांच्या आणि नागरिकांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा दिली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ आणि ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्रातील त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपला आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – छगन भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली! चतुरंग प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायी आहे. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नाडकर्णी यांनी मानसोपचार क्षेत्राला केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्य माणसापर्यंत नेले. ‘आयपीएच’ (IPH) संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो व्यक्तींना मानसिक आधार दिला आणि जगण्याची नवी दृष्टी दिली. एक उत्तम लेखक, वक्ता आणि संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी समाजावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे. त्यांच्या निधनामुळे चतुरंग परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. संवेदनशील आवाज काळाच्या पडद्याआड – गिरीश महाजन मानसिक आरोग्याबाबत समाजात जागृती निर्माण करणारा संवेदनशील आवाज काळाच्या पडद्याआड गेला… प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि समाजमन समजून घेणारे व्यक्तिमत्त्व डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. ‘IPH’ आणि ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून त्यांनी मानसिक स्वास्थ्य, समुपदेशन आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेले कार्य असंख्य आयुष्यांना नवी दिशा देणारे ठरले. डॉ. नाडकर्णी यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. मोलाचं कार्य कायम स्मरणात राहील – रोहित पवार ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, संवेदनशील लेखक, कवी आणि मुक्तांगणचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. ते एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या लेखन, व्याख्यान आणि समुपदेशनातून असंख्य लोकांना जगण्याची एक नवी दिशा मिळाली. सामाजिक क्षेत्रात मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी अत्यंत मोलाचं कार्य केलं असून ते कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने नाडकर्णी कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed