कळमनुरीत दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले:बस स्थानकावरील पोलिस चौकी बंद असल्याने चोरट्यांचे फावले

0
new-project-2026-05-16t210906745_1778945997.jpg




कळमनुरी शहरातील बस स्थानकाजवळ गजबजलेल्या रस्त्यावरून दुचाकी वाहनावर भरदा वेगात आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना शनिवारी तारीख 16 सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कळमनुरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कडपदेव येथील सुरेखा चव्हाण या त्यांचे वडील सुभाष राठोड दोघेजण कामानिमित्त कळमनुरी येथे आले होते. सायंकाळीच्या सुमारास काम आटपून दोघेही परत गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकावर येत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी भरधाव वेगात दुचाकी वाहन सुरेखा चव्हाण यांच्या जवळ आणले. त्यानंतर काही कळण्याचे आता त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. यावेळी सुरेखा चव्हाण यांना काही कळण्याच्या आताच चोरटे बेपत्ता झाले. दरम्यान गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवल्याचे त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने डायल 112 क्रमांकावर संपर्क साधला. तसेच बस स्थानकावरील पोलिस चौकीकडे धाव घेतली. मात्र पोलिस चौकी बंद असल्यामुळे त्यांना काहीही करता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे जमादार विशाल जाधव, कानबाराव हराळ व किशोर खिल्लारे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालवला आहे.
याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शहरातील बँकेसमोरून एका शेतकऱ्याचे 50 हजार रुपये चोरट्यांनी भर दिवसा पळविल्याची घटना घडली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात ही घटना घडल्याने दुचाकीवर धुमस्टाईल येऊन चोरी करणारे चोरटे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सदर घटना घडण्याच्या वेळी कळमनुरी बस स्थानकावरील पोलिस चौकी बंद होती. बस स्थानकावरील पोलिस चौकी मध्ये कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed