दिव्य मराठी ब्रेकिग:महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा प्रस्ताव, वावीजवळ 100 एकरवर उभारणार जिल्ह्यातील पहिला एमएसएमई पार्क
![]()
100 दिवसांच्या कृती आराखड्याचा पाठपुरावा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 100 एकर जागेवर एमएसएमई पार्क उभारण्याचे धोरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात नमूद केले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील वावीजवळ एमआयडीसीकडून 100 एकर जागेचा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई पार्क उभारण्याचा मानस व्यक्त करताना, अधिकाऱ्यांना 100 एकर जागेचा शोध घेण्याचे आदेश गेल्या वर्षी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागांत 100 एकर जागेसाठी चाचपणी करण्यात आली. मात्र, प्रमुख औद्योगिक वसाहती असलेल्या ठिकाणी एमएसएमई पार्कसाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने वावी येथे जागेचा पर्याय दिल्याची माहिती समोर येत आहे. सिन्नर तालुक्यात सिन्नरसह माळेगाव, मुसळगाव येथे औद्योगिक वसाहत आहे. वावी हे प्रमुख व्यापारी केंद्र असून, याठिकाणी औद्योगिक वसाहत नाही. मात्र, एमआयडीसीने यापूर्वीच औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविल्याने, त्यातीलच जागा एमएसएमई पार्कसाठी प्रस्तावित केल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक-शिर्डी हे दोन विमानतळ 60 किमीच्या आत असल्याचा फायदाही या पार्कला होऊ शकेल. ‘समृद्धी’च्या इंडस्ट्रियल टाऊनशिपमुळे महत्त्व सिन्नर तालुक्यातील वावी व इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे पर्यटन, कृषी प्रक्रिया व यांत्रिकी अभियांत्रिकीशी संबंधित वसाहती विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) नियोजन करीत असल्याचे 2023 मध्ये निमाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत एमएसआरडीसीचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी स्पष्ट केले होते. त्याचवेळी या भागात काही जागांचा शोध घेण्यात आला होता. एमआयडीसीकडून प्रस्ताव सादर प्रत्येक जिल्ह्यात 100 एकर जमिनीवर एमएसएमई पार्कची उभारणी करण्याचे नियोजन शासनाचे आहे. त्यात वावीजवळ हा पार्क उभारण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही मुख्यालयाला सादर केला आहे. – दीपक पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी मंजुरीसाठी सीईओंची भेट घेणार एमआयडीसीने यासाठीचा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर केलेला आहे. आम्ही यासंदर्भात दोन दिवसांत एमआयडीसीच्या सीईओंची भेट घेऊन हे क्लस्टर लवकरात लवकर मंजूर करावे यासाठी साकडे घालणार आहोत. – आशिष नहार, अध्यक्ष, निमा नाशिक-शिर्डी विमानतळ 60 किमीच्या आत असल्याचा फायदा सिन्नर-शिर्डी महामार्गामुळे वावीची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. नाशिकसह शिर्डी विमानतळ जवळपास सारख्याच अंतरावर येत असल्याने, एमएसएमई पार्कसाठी वावी चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय नाशिक आणि शिर्डी हे दोन विमानतळ 60 किलोमीटरच्या आत असल्याचाही फायदा या पार्कला होऊ शकेल.
