नितीन गडकरी धमकी प्रकरण: जयेश पुजारीला 5 वर्षांचा कारावास:अफसर पाशासह दोघांना 40 हजार दंड, नागपूर न्यायालयाचा निकाल

0
cf426dd4-f49d-4556-aea4-1f880758f527_1778850027383.jpg




केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयाला धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणाचा निकाल नागपूरच्या विशेष न्यायालयाने आज जाहीर केला. या प्रकरणात मुख्य आरोपी जयेश जयेशकांत शाहीर पुजारी आणि अफसर पाशा या दोघांनाही दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार के. शर्मा यांनी ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये (एकूण ४० हजार रुपये) दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण २०२३ मध्ये समोर आले होते, जेव्हा आरोपींनी कर्नाटकच्या बेळगाव येथील हिंदलगा केंद्रीय कारागृहातून विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करून नितीन गडकरी यांच्या नागपूरस्थित कार्यालयाच्या लँडलाईनवर धमकीचे कॉल्स केले होते. सुरुवातीला १०० कोटी आणि नंतर १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम न दिल्यास गडकरींना जीवे मारण्याची आणि कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या तक्रारीनंतर धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान नागपूर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वेगाने कारवाई केली. आरोपी जयेश पुजारी याच्याकडे कारागृहात असतानाही सिम कार्ड आणि मोबाईल उपलब्ध असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईलच्या पडताळणीत ‘तालिबान जिंदाबाद’, ‘टीटीपी’ आणि ‘अल्लाह अकबर’ असे देशविघातक संदेश आढळून आले. यावरून आरोपींचे संबंध ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि ‘डी-गँग’ सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी असल्याचे समोर आले. पोलिसांनी मोबाईल सीडीआर, बँक व्यवहार आणि साक्षीदारांच्या जबाबांतून हा कट न्यायालयात सिद्ध केला. या खटल्यात सरकारी पक्षाने अत्यंत प्रभावी युक्तिवाद केला. विशेष सरकारी अभियोक्ता कु. वेदिका पाटील यांनी केवळ दीड महिन्यांच्या विक्रमी कालावधीत ६४ साक्षीदारांची तपासणी पूर्ण केली. तांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची भक्कम साखळी जोडल्याने आरोपींना पळवाट उरली नाही. न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३८५, ३८७, ५०६(२), ५०७ आणि बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) कलम १०, १३(१) व १८ अंतर्गत दोषी ठरवले. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत. या संपूर्ण तपासात नागपूर पोलीस दलाचे एसीपी निलेश पालवे, पीआय प्रभावती एकुरके, पीआय डॉ. अभिजित पाटील, पीआय रितेश आहेर आणि पीआय कोपरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed