हडपसर बॉम्ब सदृश घटना दहशतवादी कृत्य नाही:वैयक्तिक वादातून घडला प्रकार, आरोपी शिवाजी राठोड पोलिसांच्या ताब्यात
![]()
हडपसर येथील रुग्णालयात ठेवण्यात आलेली बॉम्ब सदृश वस्तू दहशतवादी कृत्य नसून वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. ही वस्तू त्याच दिवशी निकामी करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी शिवाजी राठोड याच्या घर आणि दुकानाची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून घड्याळाचा रिकामा बॉक्स मिळाल्याने आरोपीची ओळख पटली. तांत्रिक तपासानंतर त्याचे लोकेशन नागपूर दिशेने असल्याचे निष्पन्न झाले. हडपसर आणि अकोला येथे पोलिसांनी ऑपरेशन राबवून त्याला नागपूर रेल्वे जंक्शन येथे एटीएसच्या मदतीने ताब्यात घेतले. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब सदृश वस्तूत कोणतेही स्फोटक नव्हते. आरोपीने ऑनलाइन डिजिटल घड्याळ मागवून ते बॉम्ब असल्याचे भासवले होते. यासाठी त्याने विविध ठिकाणांहून वस्तू गोळा केल्या होत्या, ज्याची सीसीटीव्ही फुटेजद्वारे खातरजमा करण्यात आली आहे. आरोपीने यू ट्यूबवरून बॉम्ब सदृश वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. घटनास्थळावरून फॉरेन्सिक लॅबने काही नमुने घेतले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर इतर कोणते घटक तिथे होते का, याचा तपास केला जाईल. आरोपी मूळचा सोलापूरचा रहिवासी असून, हडपसर परिसरातील मांजरी येथे त्याचे शूज आणि कपड्यांचे दुकान आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ ते १७ जणांची चौकशी केली आहे. दहा मे रोजी आरोपी संबंधित रुग्णालयात गेला होता आणि त्याच्या उपचाराच्या बिलावरून त्याचा वाद झाला होता. त्याने बिलाची रक्कम कमी करण्याची मागणी केली नव्हती. पुणे पोलीस रुग्णालयांची आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा सुनिश्चित करतील, असे आयुक्तांनी सांगितले. पोलिसांच्या तपास यंत्रणा सक्षम असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ आहेत.
