पुण्यातील रुग्णालयात IED ठेवणारा आरोपी जेरबंद:ATS ने पुलगाव रेल्वे स्थानकावर आवळल्या मुसक्या; पळून जाण्याच्या होता बेतात

0
00e3e913-4b23-4e26-9585-552b10cf6128_1778834516649.jpg




पुण्यातील हडपसर परिसरातील रुग्णालयात स्फोटक ठेवून खळबळ उडविणाऱ्या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करीत मुख्य संशयित आरोपीला नागपूरजवळील पुलगाव रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. शिवाजी राठोड हा आरोपी रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना एटीएसने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागातील उषाकिरण हॉस्पिटल परिसरात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर बुधवारी रात्री मोठी खळबळ उडाली होती. तपासादरम्यान ती कमी तीव्रतेची ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस’ (आयइडी) असल्याचे स्पष्ट झाले. या आयइडीमध्ये जिलेटीन कांड्या, डिटोनेटर, प्रिंटेड सर्किट बोर्ड आणि टाइमर यंत्रणा बसविण्यात आली होती. मध्यरात्री स्फोट होईल अशा प्रकारे टाइमर सेट करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. पुलगाव स्टेशनवर एटीएसची कारवाई या प्रकरणाचा तपास करताना एटीएसला सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार आरोपी शिवाजी राठोड हा १८०२९ शालीमार एक्स्प्रेसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसने नागपूर विभागात सापळा रचून पुलगाव रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेतले. मोठा अनर्थ टळला स्फोटक रुग्णालयातील अतिदक्षता विभागाजवळील स्वच्छतागृह परिसरात ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. वेळेत संशय आल्याने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत स्फोटक सुरक्षित ठिकाणी हलवून निकामी केले. त्यामुळे संभाव्य मोठा स्फोट आणि जीवितहानी टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed