नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला:15 वर्षीय मुलीचे भवितव्य सुरक्षित, तक्रारीनंतर कारवाई
![]()
नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील एका २४ वर्षीय युवकासोबत निश्चित करण्यात आला होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त पथकाने संबंधित युवकाच्या घरी भेट दिली. पथकाने कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करून त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. प्रशासनाच्या समुपदेशनानंतर कुटुंबीयांनी विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शवली. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहून अशा घटनांची माहिती तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा संबंधित प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही संपूर्ण कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत चाईल्ड हेल्पलाईनचे अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, न्यू विजन फाउंडेशनच्या प्रियंका होटे तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या पारामीता गजभिये आणि रूपाली वानखेडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
